महाडमध्ये ९० वा मनुस्मृती दहन दिन साजरा :

देशात मनूवादी सरकार, समाजाने एक होणे गरजेचे  – आनंदराज आंबेडकर

महाड (निलेश पवार) : महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले होते. या दिनाचा ९० वा स्मृतिदिन आज महाडमध्ये उत्साहात साजरा झाला. बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीने सभा घेण्यात आल्या. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना देशात पुन्हा मनुवादी सरकार आले असून, भावी पिढीला गुलाम होण्यापासून वाचवायचे तर समाजाला एक व्हावे लागेल असे मत व्यक्त केले.

महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ साली मनु रचित मनुस्मृती हा ग्रंथ जाळून टाकला. या ग्रंथाने समाजातील तळागाळातील समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. शिवाय महिलांवर अन्याय होईल अशा प्रकारे बंधने घालण्यात आली होती. या मनुस्मृती दहन दिनाचा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला. या दिवसाला महिलांमधून मोठे महत्व प्राप्त झाले आहे. वंचित विकास महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत या गेली २० वर्षापासून महिला मुक्ती दिन साजरा करत आहेत. यामुळे आज महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रमिला संपत यांच्या नेतृत्वाखाली महाड शहरातून महिलांनी मोठी रॅली काढली. यावेळी मंडळाच्या वतीने एका परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाबासाहेबाच्या तत्वातील स्त्री उथानामध्ये सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक अडथळे आणि उपाय. बौद्ध धर्मावरील ब्राम्हणी आक्रमणाच्या क्लुप्त्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे स्त्री शोषण आणि होणारा वापर, वाढते स्त्री आणि दलितांवरील अन्याय या विषयांचा समावेश होता. या महिला परिषदेला संपूर्ण राज्यातून महिलांनी हजेरी लावली होती. चवदारतळे आणि क्रांतीस्थंभ परिसर यामुळे गजबजून गेला होता.

बौद्धजन पंचायत समिती कडून देखील क्रांतिभूमीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारपिठावर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, आर.सी.तांबे, किशोर मोरे, प्रा.रमाकांत यादव, के.एम.तांबे, लक्ष्मण भगत, विनोद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे कार्य देशातील तमाम कष्टकरी, दलित, शोषित, महिला आदी वर्गासाठी होते. यामुळे त्यांची जयंती जगभरात साजरी होते. मात्र आम्ही रस्तोरस्ती जयंती साजरी करत असलो तरी सत्तेपासून दूर आहोत आणि ज्या आर.एस.एस.च्या नेत्यांच्या जयंत्या सभागृहाच्या आत कधी होते ते समजत देखील नाही ते मात्र सत्तेत बसतात हि शोकांतिका असल्याचे स्पष्ट केले. आपला समाज हा मेंढराप्रमाणे चालत आहे. यामुळे देशात आता मनुवादी सरकार आले आहे. आपली भावी पिढी वाचवायची असेल तर समाजाला एक व्हावे लागेल असे मत व्यक्त केले.

क्रांतिस्तंथ झाकून जातो तेव्हा …
महाड मध्ये २० मार्च आणि २५ डिसेंबर हे दोन मोठे कार्यक्रम होतात. या दोन्ही कार्यक्रमांना विविध राजकीय आणि धार्मिक संघटना आपापले मंडप उभे केले होते. यामुळे क्रांतीस्तंभ अक्षरशा झाकून गेला होता. शिवाय दोन्ही सभा एकाच वेळी सुरु झाल्याने कांही काळ तणाव निर्माण झाला होता. क्रांतीस्थंभ परिसरात महाड नगर परिषदेने थातुरमातुर सुविधा उभी केल्याने सालाबादप्रमाणे हजारो भीम सैनिकांना क्रांतीस्तंभ परिसरात उघड्यावरच रात्र काढावी लागली. क्रांतिस्तंभ परिसरात भंगारात पडलेले मोबाईल घाण आणून ठेवण्यात आली हेाती. पिण्याच्या पाण्याची सुविधा मात्र करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, माता रमाई सभागृह रात्री राहण्याकरिता खुले करण्यात आले होते.

कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे ठिय्या आंदोलन 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभी केली जाणारी कमान हि नाते खिंड याठीकाणी उभी केली जावी अशी मागणी करीत आज कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेने महाड नगर परिषदेच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले . संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष संघराज तांबे, सचिव दीपक पवार, अनिल जाधव, बबनभाई राजापकर, महाड तालुकाध्यक्ष बाळकृष्ण साळवी, दीपक महाडिक, भीमराव तांबे, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी क्रांतीस्तंभाला अभिवादन करून या आंदोलनाला सुरवात करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना देखील संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी स्थानिक विविध राजकीय संघटनाच्या पदाधिकार्यांनी मात्र स्थानिक आणि बाहेरचे असा वाद निर्माण केला. सदर संस्था बाहेरून येऊन कांही करत असेल तर जमणार नाही असे सांगण्यात आले. मात्र आपल्या मागण्या रास्त आहेत यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहील असे ठणकावून सांगत प्रकाश मोरे यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले.

बार्टीच्या पुस्तक रथाला प्रतिसाद

शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून क्रांतीस्तंभ याठिकाणी पुस्तक रथ आणला होता. यामध्ये असलेली पुस्तके ८५ टक्के सवलत दराने विक्री होत असल्याने याठिकाणी भीम अनुयायी आणि भीमसैनिकांनी पुस्तक खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे महाडमधील स्मारकाचे व्यवस्थापक प्रशांत धीवार यानी स्वत: हजर राहून हा उपक्रम पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!