एक ‘ठाकरे’ चालक ते समालोचक …
निलेश मदाने/ नागपूर 
नागपूर अधिवेशन कालावधीतील वास्तव्यात नियुक्त शासकीय वाहनावरील चालक मूळ नागपुरातीलच मिळणे हा कपिलाषष्टीइतकाच दुर्मीळ योग मानावा लागेल. बहुतांश वाहने-जिप,कार इत्यादि अन्य जिल्ह्यांमधून अधिवेशन कालावधीसाठी नागपुरात येत असतात. चालकांना नागपुरातील रस्ते आणि वळणे समजून येईपर्यंत अधिवेशन संपलेले असते. दरम्यानच्या काळात वाहन ज्यांच्यासाठी दिलेले असते त्या अधिकारी- कर्मचारी वर्गाची नवोदित वाहनचालकांना रस्ते समजून सांगतांना दमछाक होत बऱ्याचदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तात्पर्य, चक्रधरस्वामी जितके माहितगार आणि तत्पर तितका पुढील प्रवास सुकर होतो ! यंदाच्यावर्षी हा योग जुळून आला कृषीखात्याच्या सेवेतील जिपवरील नागपूरकर चालक श्री. प्रभाकर ठाकरे यांच्यामुळे.
ठाकरे केवळ ‘चालक’ नसून नागपुरच्या गत चार दशकांच्या राजकीय-सामाजिक वाटचालीचे ‘समालोचक’ देखील आहेत. म्हणजे एखादा उत्तम आचारी आहारतज्ञही असावा यासारखा हा प्रकार आहे. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रासाठी  अधिवेशनकाळात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आमची पहिली भेट झाली त्यावेळी त्यांच्या पेहरावावरून मी त्यांना आदराने ‘सत् श्री अकाल’ म्हंटले… त्यांनीही तसेच म्हणत आणि हसत त्याचा स्वीकार केला. पण, नंतर गाडीतून एकदिवस विधानभवनाकडे जातांना भगव्या फेटयाचे रहस्योदघाटन त्यांनीच केले. त्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारतांना नागपूर आणि विदर्भातील अनेक राजकीय-सामाजिक संदर्भ विशेषत: शिवसेनेशी संबंधित अनेक घटना समजावून घेता आल्या. १९८० ते १९९० हे दशक शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराचे होते. मराठी कुटुंबातील ठाकरे ‘ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’ तसेच आक्रमक हिंदुत्व या शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेकडे ओढले गेले. त्यावेळी विशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाकरे यांनी नागपूर शहर आणि परिसरात ‘जय युवा क्रांती दल’ संस्थेच्या १३३ शाखा स्थापन केल्याचे ते सांगतात. या सर्व शाखा आणि त्यामार्फत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले. ठाकरेंनी भगवा फेटा वजा पगडी डोक्यावर चढवली ती याच सुमारास. पुढे तत्कालीन कृषीमंत्री श्री. नानाभाऊ एंबडवार यांच्या आशीर्वादाने ते याच खात्यात चालक म्हणून रुजू झाले तरी डोक्यावरील हे आभूषण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारा त्यांचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र अद्यापही कायम आहे. आ.श्री. विजय वडेट्टीवार शिवसेनेत असताना ठाकरे आणि नागपुरातील तमाम शिवसैनिकांची उठबस आमदार निवासातील त्यांच्याच कक्षात असायची. युती शासन (१) काळात हे नागपुरकर ठाकरे मुंबईकर ठाकरेंना भेटण्यासाठी शिवसैनिकांसह जात तेव्हा भगवी पगडी लांबूनच दिसत असल्यामुळे दादर रेल्वेस्टेशनवर त्यांना घेण्यासाठी आलेल्या मुंबईतील शिवसैनिकांचे काम सोपे व्हायचे…
चालक आणि समालोचक असे दोन्हीही गुण असल्याने नागपुरातील सर्वपक्षीय अंतर्गत घडामोडींची बित्तंबातमी ठाकरेंकडे असते. सध्या देवेनभाऊंच्या कोण जवळ आहे, कोणाला लांब ठेवले आहे, नितीनभाऊंनी परवा कोणाला फटकारले इथपासून पातुरकरांचे तिकिट कोणी कापले अन् बंगाले नगरसेवक कसे झाले, असे बरेच काही… गाडीतून रवीभवनकडे जात असतांना चक्रावरील एक हात समोरच्या दिशेने नेत, ही संपूर्ण जागा घटाटे यांची होती… त्या काळात घटाटे परिवाराकडे स्वत:चे चार्टरप्लेन होते असे त्यांनी सांगितले… घटाटे परिवाराचे रा.स्व.संघ आणि जनसंघासाठीचे योगदान यासंदर्भात मला माहिती आहे. जनसंघ संस्थापकांपैकी एक पं. दीनदयाळजी उपाध्याय आग्रा भागात संघटनाविस्तारासाठी असतांना त्यांचे समवेत श्री. घटाटे हे देखील कार्यरत होते असा उल्लेख माझ्या वाचनात आला होता. त्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्यांना भेटण्याची माझी इच्छा ठाकरे यांच्यामुळेच पूर्ण झाली…
चालकपदी सेवा करता करता कार्यकर्तेपणही ते सांभाळत आहेत. त्यांच्या भागातील ओझा यांच्या घरात शेजारच्या झाडाच्या फांद्या घुसत असल्यामुळे त्या कापाव्यात यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे त्याचा पाठपुरावा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. निवृत्तीनंतर पूर्णवेळ राजकारणात येण्याचा त्यांचा मानस आहे.  त्यांच्या दोनही कन्यांचे विवाह झालेले असल्याने कौटुंबिक जबाबदारी विशेष नाही. नागपूर अधिवेशनातील वास्तव्य दरवर्षी नवे संदर्भ जोडत असते. खरे टाऊन, धरमपेठ येथील श्री. अविनाश राऊत, कार्यकारी अभियंता, महावितरण येथे दरवर्षी एकदा स्नेहभोजन आणि गप्पांची मैफल रंगत असतेच. वडील विद्युत मंडळातील सेवानिवृत्त असल्याने विद्युतनगर, नाशिक पासूनचे हे कौटुंबिक स्नेहसंबंध माझ्या नागपुरातील वास्तव्यामुळे कायम आहेत. यंदाच्या वर्षी भेटलेले चालक आणि समालोचक ठाकरे हे व्यक्तिमत्व आता मित्र परिवारातील लक्षणीय भर ठरली आहे…
          (लेखक : विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
One thought on “एक ‘ठाकरे’ चालक ते समालोचक …”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *