ऊर्जा क्रांतीचे प्रतीक ठरणा-या सौभाग्य योजनेचे शनिवारी राज्यस्तरीय उद्घाटन
मुंबई (अजय निक्ते ) ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच “सौभाग्य” योजनेचे राज्यस्तरीय उद्घाटन शनिवार २३ डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजताकेंद्रीय ऊर्जा व नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर के. सिंग, यांचे शुभहस्ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह. सिव्हील लाईन्स, नागपूर येथे पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहतील.
देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला ‘सौभाग्य’ योजना सुरू केली, या योजनेअंतर्गत डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे अभियान सुरु करण्यात आले असून या योजनेचे राज्यस्तरीय उद्घाटन शनिवारी नागपूर येथे करण्यात येणार असून या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणिय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे आणि ऊर्जा राज्यमंत्री नामदार मदन येरावार उपस्थित राहतील.
देशभरातील तब्बल ४ कोटी घरांना वीज जोडणी देण्यासाठी, गावागावात वीज पोहोचावी यासाठी केंद्र शासनाने तब्बल १६ हजार कोटींपेक्षा अधिकच्या निधीची तरतूद केली असून या योजनेंतर्गत गरिबांना मोफ़त तर इतरांना केवळ ५०० रुपयांत वीज जोडणी देण्यात येणार असून या रकमेचा भरणा वीज ग्राहकाला १० सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामिण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी दिल्या जाणार असल्याने रोजगारांच्या संधीत वाढ होऊन स्त्रियांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणांचे नवीन दालन उघडणार आहे.