डोंबिवली क्रिडासंकुलातील कचरा 24 तासात उचला, अन्यथा महापौर- आयुक्तांना भेट देणार : मनसेचा इशारा
डोंबिवली : दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमामुळे डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात सर्वत्रच कचरा पसरलाय. पण पालिका प्रशासनाने याकडं दुर्लक्ष केल्याने मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरलीय. त्यामुळे क्रिडासंकुलात येणा-या खेळाडू आणि नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. येत्या २४ तासात हा कचरा उचलला न गेल्यास महापौर राजेंद्र देवळेकर आणि महापालिका आयुक्त पी वेलारासू यांना सप्रेम भेट पाठवून देऊ असा कडक इशाराच मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिलाय.
डोंबिवली क्रिडा संकुल मैदान हे एकमेव मोठं मैदान खेळाडूंना खेळण्यासाठी आहे. सकाळ व संध्याकाळच्यावेळी जेष्ठ नागरिक व डोंबिवलीकर वॉक करण्यासाठी येत असतात. वेगवेगळया उत्सवांसाठी मैदाने भाडयाने दिले जात असल्याने खेळाडूंच्या खेळास आणि नागरिकांच्या फिरण्यास आपोआपच बंदी येते. दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाचा कचरा-अन्नपदार्थ सर्व मैदानभर पसरले आहे त्यामुळे सर्वत्रचदुर्गंधी पसरली आहे व्यायामाला,फिरायला व खेळायला येणाऱ्या नागरीकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कदम यांनी नाराजी व्यक्त केलीय. मैदानाच्या कार्यक्रमानंतर होणा- या त्रासाबाबत कायम स्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात पालिका प्रशासनाला अनेकवेळा सांगण्यात आलय मात्र पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा नेहमीच दृष्टीस पडतो त्यामुळे आता हा कचरा, कुजके अन्न पदार्थ आयुक्त आणि महापौरांनाच भेट देण्याचा निर्णय घेतला आहे असे कदम यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमांसाठी उपलब्ध करताना इतर खाजगी मैदाने पैसे घेउन स्वच्छ,सुंदर ठेवली जातात त्याचाही नगरसेवक व पालिका अधिका- यांनी अभ्यास वर्ग त्या- त्या खाजगी मैदाने संस्था चालकांकडून करून घ्यावा त्यामुळे करदात्या नागरिकांचे भलं होईल असा टोलाही कदम यांनी लगावलाय.