जीव धोक्यात घालून रिक्षासाठी “त्या ” रेल्वे प्रवाशांची रोजचीच शर्यत
रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
कल्याण (प्रविण आंब्रे):– सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर लोकलच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आंबिवली स्थानकात रिक्षा पकडण्यासाठी एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी रेल्वेमार्गात उड्या मारुन जीव धोक्यात घालण्याची शर्यत लागत असल्याचे चित्र कल्याणजवळील आंबिवली स्थानकात रोज सायंकाळी पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या स्थानकात कल्याणच्या दिशेला एकच पूल असून त्याचा वापर केवळ २० ते ३० टक्के प्रवासी करताना दिसत आहेत. टिटवाळ्याच्या दिशेने नविन पुल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलय. त्यामुळे याकडं रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचावे लागते. त्यासाठी धावपळ करीत त्यांना रेल्वे स्थानक गाठून लोकल पकडावी लागते. हाच चाकरमानी पहाटेपासून ते रात्री घरी येईलपर्यत कामानिमित्त घराबाहेर असल्याने त्यांच्या कुटुंबियांचा जीवात जीव नसतो. अशातच काही चाकरमानी सायंकाळच्या सुमाराला कल्याण – कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकातून घर गाठण्यासाठी जीवाची पर्वा न करता रिक्षात पकडण्यासाठी रेल्वेच्या एका फलाटावरून दुस-या फलाटावर रेल्वेमार्गात उड़्या टाकत फलाट ओलांडून रिक्षा पकडतानाचे चित्र रोज सायंकाळी बघायला मिळते. अशावेळी एखादी मेल-एक्सप्रेस स्थानकात वेगाने आल्यास प्रवाशांची घाई त्यांच्या जीवावर बेतण्याची भीती असते. तरीही प्रवाशांचा बेदरकारपणा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे या स्थानकात कल्याणच्या दिशेला एकच पूल असून त्याचा वापर केवळ २० ते ३० टक्के प्रवासी करताना दिसत आहेत. टिटवाळ्याच्या दिशेने नविन पुल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी बरेचशे बेदरकार प्रवाशी रिक्षा पकडण्यासाठी त्या पुलाचा वापर न करण्याचीच शक्यता आहे. या स्थानकात एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने तातडीने रेल्वेमार्गात लोखडी कुंपण घालण्याची गरज येथील प्राणवायु सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या गंभीर प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
घराच्या भरमसाठ किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना कल्याणच्या पुढे घर घेणे अवघड होवून बसल्याने आंबिवली (पूर्व) रेल्वे स्थानकापासून सुमारे दिड किलोमीटर अंतरावरील बल्याणी गावात मोठ्या प्रमाणात चाळी उभ्या राहिल्या असून त्या ठिकाणी लोकवस्ती वाढलीय. या भागात रिक्षाची संख्या कमी असल्याने घरातून निघताच रिक्षा पकडण्याची घाई, त्यानंतर लोकलने लोंबकळत परतीचा प्रवास करून सायंकाळी आंबिवली स्थानकातून घरी जाण्यासाठी लोकलमधून उतरताच जीव धोक्यात घालून या फलाटावरून दुसऱ्या फलाटावर रिक्षा पकण्यासाठी सैरावैरा धावतानाचे दृश्य रोजचेच झाले आहे.