काँग्रेसमध्ये आजपासून राहुलपर्वास सुरूवात
दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र खासदार राहुल गांधी यांनी आज स्वीकारली. राहुल गांधी हे काँग्रेसचे 18वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत. सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आजपासूनल राहुल पर्वास सुरूवात झालीय.
देशातील सर्वात जुन्या अर्थात 132 वर्षांच्या पक्षाचा नवा अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची निवड करण्यात आली.काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. दिल्लीतील 24 अकबर रोडवरील AICC म्हणजेच काँग्रेस मुख्यालयात आज राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला . यासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत जमा झाले. विविध राज्यातील आलेल्या कार्यकर्त्यांनी त्या त्या राज्याची लोककला सादर करुन, एक भारत, श्रेष्ठ भारतचं दर्शन घडवलं. या सोहळ्याला मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या निवडीनंतर देशभरात काँग्रेसने आनंदोत्सव साजरा केला.
तरूणांनो एकत्र या, राहुल गांधीची तरूणांना साद
काँग्रेस पक्षाला ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला ‘ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी’ बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु, असे आवाहन काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “भाजपचे लोक देशभर हिंसेची आग पसरवत आहेत, ही आग रोखण्याची ताकद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच आहे. हे करण्यापासून भाजपला कोणी रोखू शकतो तो फक्त काँग्रेसाच प्रेमळ कार्यकर्ता आणि नेता. द्वेषाच्या राजकारणाविरोधात आपण लढा देऊ”, असा विश्वासही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.
राहुल खंबीर आहे…. सोनीया गांधी
राहुल माझा मुलगा आहे त्यांची स्तुती करणार नाही पण तो आता खंबीर आहे राहुलने लहानपणापासून हिंसा पाहिलीये. जेव्हा राहुल राजकारणात आला तेव्हा त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला. पण, राहुल हा खंबीर आणि मृदुभाषी व्यक्ती आहे तो नक्की काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेईल असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. राजीव गांधी यांच्यासोबत लग्नानंतर इंदिरा गांधी यांनी मला मुलीसारखं समजलं. 1984 मध्ये जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा मला माझी आई सोडून गेली होती. त्यांच्या जाण्यानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी धुरा सांभाळली पण त्यांचीही हत्या झाली हे सांगताना सोनिया गांधी भावूक झालाय. 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी अध्यक्ष झाले, तेव्हा माझ्या मनात प्रचंड भीती होती आणि माझे हात कापत होते. माझ्या पुढे खूप कठीण कर्तव्य होतं पण लोकांना प्रतिसाद दिला. त्या बद्दल सर्वांची आभारी आहे.