बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही : राज ठाकरेंचा इशारा
५ ऑक्टोबरला राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा
मुंबई : मुंबईत बुलेट ट्रेनची एक टक्काही गरज नाही. जोपर्यंत मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित होत नाही त्यांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मुंबईत शुक्रवारी एलफिस्टन-परेल पुलावर चेंगराचेंगरी होऊन 22 लोक मृत्यूमुखी पडले तर 36 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज ठाकरेंनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात येत्या 5 ऑक्टोबरला मुंबईत चर्चगेट स्टेशनच्या मुख्यालयाबाहेर मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. या मोर्चाचे नेतृत्व स्वत: राज ठाकरे करणार आहेत. मुंबई शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. भाजप आणि काँग्रेस सरकार आले किंवा गेले काहीही फरक पडलेला नाही. परप्रांतियांच्या लोढयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना रोखल्याशिवाय मुंबईतील समस्या सुटणार नाहीत असे सांगून राज यांनी परप्रांतियांवर निशाना साधला. मुंबईत चालणे मुश्किल आहे मग बुलेट ट्रेन कशाला पाहिजे . मोदींनी तिकडे गुजरातमध्ये काय करायचे ते करावे. आम्ही बुलेट ट्रेन नको म्हणजे नको. बुलेट ट्रेनबाबत जोर, जबरदस्ती झाली तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ असाही इशारा राज यांनी दिला. काँग्रेस सरकार असताना फुटपट्टी घेऊन फलाटाची उंची व रूंदी मोजणारा खासदार किरीट सौमय्या आता कुठे गेलायं? असाही सवाल राज यांनी उपस्थित केला.
———-