राज ठाकरे शरद पवारांची घेणार मुलाखत : पुण्यात ३ जानेवारीला होणार कार्यक्रम
पुणे : महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम येत्या ३ जानेवारीला पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत. ‘तेल लावलेले पेहेलवान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांना प्रश्नांच्या कैचीत राज कसे पकडणार याची एक वेगळीच उत्सुकता लागून राहिलीय.
शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केलय. शरद पवार यांच्या अनेक मुलाखती झाल्या. तथापि या मुलाखतींमध्ये रंगतदार असे फारसे काही नव्हते. त्यामुळे चौकटीबाहेर जाऊन महाराष्ट्राला पुढील ५० वर्षे लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सुरू केला. अनेक नावांवर चर्चा झाली. दोन अडीच महिन्यांपासून हा शोध सुरू होता. ‘जागतिक मराठी अकादमी’चे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांचे नाव सुचवले. त्यानंतर शरद पवार यांची प्रकृती तसेच राज ठाकरे यांची संमती यावर चर्चा होऊन ३ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आलीय. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही पुढाकार घेतला.या प्रकट मुलाखतीमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज हे आयत्या वेळी थेट प्रश्न विचारणार आहेत.त्यामुळे ठाकरे भाषेत राज यांच्या प्रश्नांची सरबत्ती पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष वेधलय.