…तर वाहनाचा पालिकेकडून लिलाव होऊ शकतो

मुंबई : रस्त्यावर, पदपथावर अथवा सार्वजनिक जागेत वाहन उभ केल्यानंतर ते नेण्यासाठी विसरलात तर पालिकेकडून ती वाहने टोइंग करून उचलली जाऊ शकतात. ते वाहन ३० दिवसापर्यंत दंड भरून सोडवता येणार आहे. पण जर ३० दिवसात ही वाहने न सोडवल्यास पालिकेकडून त्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सावधानता बाळगावी लागणार आहे.

महापालिका क्षेत्रात रस्त्यावर पदपथावर अथवा सार्वजनिक जागेत असलेल्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते. मात्र अवघे सहा टोईंग वाहन असल्याने कारवाई वेगवान होत नव्हती. अखेर महापालिकेने ही कारवाई जलद गतीने होण्यासाठी आणखी ४ टोईंग वाहन उपलब्ध केली आहेत. त्यामुळे टोईंग वाहनांची संख्या १० झाली आहे. यापैकी ७ परिमंडळात ७ वाहने ठेवण्यात येणार आहेत. तसेच परिमंडळ २, ४ आणि ५ या परिमंडळात प्रत्येकी १ अतिरिक्त वाहन असणार आहेत. टोइंगची संख्या वाढल्याने अश्या वाहनावर कारवाईची प्रक्रिया वेगवान होणार आहे.. रस्ते पदपथ आणि सार्वजनिक जागेत ही वाहने सोडून दिली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत. तसेच वाहनांमध्ये जमा होणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्तीची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन पालिकेने ही कार्यपद्धती तयार केलीय.

काय आहे कार्यपद्धती ..
पालिकेच्या अभियंत्यांकडून सर्वेक्षण करून अश्या वाहनावर प्रथम नोटीस चिटकवण्यात येणार आहे. त्यानंतर ४८ तासात हे वाहन सबंधितांनी उचलून नेले नाही तर पालिका ते वाहन उचलून गोडावून मध्ये जमा करेल. हे वाहन ३० दिवसापर्यंत संबंधितांनी दंड भरून सोडवता येणार आहे. मात्र त्यानंतर त्या वाहनाचा पालिकेकडून लिलाव करण्यात येणार आहे.

तक्रारही करता येईल..
आपल्या परिसरात एखादे सोडून दिलेले वाहन आढळल्यास त्याविषयीची तक्रार महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर करता येते. त्याचबरोबर महापालिकेच्या www.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
——–
पालिकेकडून मार्च महिन्यात २ हजार २३१ वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. या पोटी महापालिकेला ४१ लाख ३२ हजार रुपये महसूल मिळाले होते. तर ऑगस्ट महिन्यात झालेल्या २ हजार ७४७ वाहनांच्या लिलावातून महापालिकेला ९५ लाख ९६ हजार रुपये मिळाले होते. जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत साधारणपणे रुपये १ कोटी ६८ लाख २४ हजार एवढी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. तसेच जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत उचलण्यात आलेल्या २ हजार २३५ वाहनांपैकी ३४६ वाहने संबंधितांनी दंड भरुन सोडवून नेली होती. या पोटी महापालिकेला ३० लाख ९६ हजार रुपये एवढा महसूल प्राप्त झालाय.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!