नितीन आगे ला न्याय द्या :  विद्यार्थी भारतीचे आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे राहणाऱ्या  नितीन आगे या तरुणाची अमानुषपणे  हत्या करण्यात आली. पुरावे असतानाही  नितीनला न्याय मिळाला नाही.  त्यामुळे नितीनला न्याय मिळावा या मागणीसाठी  सोमवारी विद्यार्थी भारतीने आझाद मैदानात एक दिवसीय  लाक्षणिक उपोषण केले.  या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, ही केस फास्टट्रेक कोर्टात चालवली जावी, मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि फितूर  झालेल्या साक्षीदारांची चौकशी व्हावी अशा मागण्या विद्यार्थी भारतीकडून यावेळी  करण्यात आल्या. माजी न्यायाधीश व मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थुल यांनी संध्याकाळी विद्यार्थ्यांचे  उपोषण सोडवले.
विद्यार्थी भारतीच्या राज्य अध्यक्षा विजेता भोनकर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. या उपोषणात अकरावीतील विदयार्थीही सहभागी झाले होते. नितीनची एका उच्चजातीय मुलीशी जवळची मैत्री होती आणि यामुळे त्याच गावातील उच्चजातीय लोकांनी नितीनला शाळेतून अनोळख्या ठिकाणी खेचत नेऊन मारहाण करीत जीवानिशी मारून टाकले. आणि गावात झाडावर लटकवले. हे प्रकरण घडल्यानंतर अनेक पुरावे असताना देखील साक्षीदार फितूर झाले असे सांगून जिल्हा सत्र न्यायालयाने नितीन आगे ला न्याय दिलेला नाही असा आरोप भोनकर यांनी केला. नितीनवर झालेला हा अन्याय विद्यार्थी भारती कदापिही  सहन करणार नाही आज एक नितीन गेला पुढे अनेक जायला वेळ लागणार नाही असे विद्यार्थी भारती राज्यसंघटक स्वप्निल तरे म्हणाले.  न्यायव्यवस्थेचा निकाल हा आता जाती व्यवस्थेनुसार ठरवण्यात येणार आहे का ? असा संतप्त सवाल कोकण अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला. दरम्यान विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने गृह विभागाचे उपसचिव सूर्यकांत निकम यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केले आहे . सदर निवेदन मुख्यमंत्र्यांकडे अधिवेशनात पाठवण्यात येईल असे आश्वासन उपसचिवांनी दिले आहे. अशी माहिती मुंबई संघटक शुभम राऊत यांनी दिली.  विद्यार्थी भारती कार्यध्यक्षा स्मिता साळुंखे,  मुंबई अध्यक्षा प्रणय घरत आदीनी सहभाग घेतला होता.
नितीनला न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच
विद्यार्थी भारतीच्या आंदोलनानंतर ही सरकार जाग झालं नाही तर पुढचं आंदोलन अहमदनगर येथे करण्यात येणार आहे. नितीनला न्याय मिळत नाही तोपर्यंत  ही लढाई अशाच पद्धतीने सुरू राहील. या पुढचं आंदोलन हे अहमदनगर येथे होणार आहे विद्यार्थी भारती लवकरच नितीन आगेच्या शिक्षकांना व गावातील पोलीस यंत्रणेला गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थी भारती विद्यापीठ अध्यक्षा ज्योती निकाळजे कार्यध्यक्षा मोनाली भोईर  यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!