…तर ४१लाख शेतकऱ्यांची नावे पत्ते स्टॅंप पेपरवर लिहून
द्यावेत : विरोधी पक्षनेत्यांचे सरकारला आव्हान
कर्जमाफीतील विलंब, कापूस-धानाचे नुकसान, सोयाबीनच्या भावावरून विरोधकांचा गोंधळ
नागपूर  :  सरकार ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे सांगतेय. सरकारने खरोखर कर्जमाफी दिली असेल त्यांनी  ४१ लाख शेतकऱ्यांचे नाव-गाव स्टॅंप पेपरवर लिहून द्यावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला दिले.
 यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सोबत आणलेला १०० रूपयांचा स्टॅंप पेपर विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी कर्जमाफी योजनेतील विलंब, कापसावरील बोंडअळी, धानावरील तुडतुडा, सोयाबीन खरेदीत झालेली शेतकऱ्यांची लूट आदी मुद्यांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, कापसाला २५ हजार रूपये एकरी तर धानाला १० हजार रूपये एकरी भरपाई द्यावी, तसेच सोयाबीनला प्रति क्विंटल ५०० रूपये मदत जाहीर करावी, अशी मागणीही विखे पाटील यांनी सभागृहात बोलताना केली.  शेतकरी कर्जमाफी योजनेत सरकारने घोळ घातल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचे थकित कर्ज संपलेले नाही. कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी,अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली. सभागृह सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी दिली.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *