देवगंधर्व महोत्सव ३ रे पुष्प : विशालकृष्णजींच्या नृत्याविष्याकाराने रंगला !
डोंबिवली : कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व महोत्सवातील तिसऱ्या दिवसाची सुरवात कत्थक नृत्य सादरीकरणाने झाली. प्रसिद्ध कत्थक नृत्यकलाकार विशाल कृष्ण हे या नृत्यपुष्पाचे मानकरी होते. ‘देवी सुरेश्वर भगवती गंगे त्रिभुवन तारिणी’ अश्या सुरेख शब्दांत असलेल्या गंगा वंदनेनी नृत्यास सुरवात केली. कत्थक नृत्याची प्रदीर्घ परंपरा असलेल्या घरात विशाल कृष्ण ह्यांचा जन्म! त्यामुळेच विशाल ह्यांच्या नृत्यशिक्षणाची सुरवात त्याच्या दादी बुवा सितारा देवी आणि वडील मोहन कृष्ण ह्यांच्याकडे झाले.
सदाबहार ताल त्रिताल पेश करण्यात आला. तबला आणि पखवाज ह्यांच्यामध्ये होणार बोलांचा संवाद कार्यक्रमाची रंगात वाढवत होती. लयीच्या अंगानी कधी लयीबरोबर कधी तीच्याशी खेळत असा अतिशय तयारीचा तत्कार सादर केला. ‘ताथै तत्’ ह्या बोलांचा विस्तार करत अँड़ आणि जोडआमद पेश केला. ‘तिटकत गदिगन’ ह्या बोलांचा सुरेख वापर करून सुंदर नृत्यविस्तार केला. पुढील नृत्यसदारीकरण हे चौपल्ली, तसेच पखवाजाचे प्राबल्य दाखवणारे ‘धातिट तिट’ बोल अधिक खुलत गेले. दोन लयींनी मध्ये असणारी दुपल्ली आणि त्यावर विशाल ह्यांची अतिशय नजाकतीने चक्कर घेण्याचे सादरीकरण प्रेक्षकांची दाद घेऊन गेली. गुरूंकडून शिकलेला पारंपरिक रचना त्यात प्रिमलू, अनेक तिहाया, तसेच ‘धा’ ह्या बोलाला घेऊन केलेला सफर का जोडा विशाल ह्यांची अपार मेहनत, त्यांच्या गुरुप्रती असलेललं प्रेम दर्शवत होता. तबला वादक श्री. विवेक ह्यांनी देखील त्यांच्या गुरूंकडून शिकलेल्या जुन्या रचनांची प्रस्तुती केली. कत्थक नृत्यशैलीची महान परंपरा आणि वारसा लाभलेले विशाल कृष्ण! त्यांच्या नृत्यसादरीकरणातून दादीबुवा सितारा देवीजी, दादाजी श्री. दुर्गप्रसादजी, परदादा आचार्य सुखदेव महाराजाजी ह्यांच्या आणिक सुंदर पारंपरिक रचना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या हि एक अनोखी पर्वणी होती. ‘गतप्रस्तुती’ घुंघट गत’ तसेच ‘आज गोपाल लिये बार्ज बाल’ ह्या बोलांवरील मयूररूपी कृष्ण सर्वांच्या मनात घर करून गेला. चक्करदार परन, विविध तत्कार, फर्माईशी अशी विविधता विशाल ह्यांच्या नृत्यात पाहायला मिळाली. नृत्याच्या समारोप हा थाली तात्कारांनी करण्यात आला. थालीवर केलेले अप्रतिम नृत्यसादरीकरण हे रसिकांच्या मनात आणि आठवणीत कायमचं राहील. सतार वादक:- अलकाताई गुजर, गायक मनोज देसाई , तबला वादक विवेक आणि पखवाज विकास यांनी साथ दिली.