एट्रोसिटीच्या आरोपीला खटला लढविण्यासाठी महानगरपालिका करणार आर्थिक मदत 

उल्हासनगर  : उल्हासनगर मनपाचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या विरोधात एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांना खटला लढविण्यासाठी  आर्थिक मदत करण्याचा वादग्रस्त  निर्णय  महानगरपालिकेने घेतला आहे . मनपाच्या स्थायी समितीने बहुमताने हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे .

5 जुलै 2017 रोजी मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मनपा कार्यालयात रिपाई नगरसेवक भगवान भालेराव यांच्या विरोधात जातीवाचक वक्तव्य केले होते . या प्रकरणी कल्याण सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर निंबाळकर व काही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सध्या निंबाळकर यांना या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला आहे . शिवसेना , रिपाई, भारिपच्या नगरसेवकांनी निंबाळकर यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले होते . शहरातील बहुजन समाजाच्या संघटना तसेच सोशल मीडियावर देखील त्यांच्या विरोधात वातावरणात असतांना काल अचानक स्थायी समितीच्या बैठकीत निंबाळकर यांना एट्रोसीटी व अन्य एक खटला लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला . भाजप , साई व टीम ओमी कलानीच्या 7 नगरसेवकांनी निंबाळकर यांना हा निधी मिळावा म्हणून समर्थन केले तर शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी विरोध केला आहे . भाजप , साई पक्ष व टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांचा देखील निंबाळकर यांना आर्थिक मदत मिळण्याच्या प्रस्तावाला विरोध होता मात्र भाजपच्या एका राज्यमंत्र्यांचा त्यांना फोन आल्यानंतर त्यांनी तात्काळ निंबाळकर यांच्याबाजूने निर्णय घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.

या निर्णयाला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाई शहरजिल्हा प्रमुख भगवान भालेराव तसेच भाजपच्या काही नेत्यांनी देखील विरोध केला आहे . सोशल मीडियावर देखील या वादग्रस्त निर्णयावर जोरदार टीका होत आहे . मनपाच्याच एका कर्मचाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या विरुद्ध एट्रोसिटीची तक्रार केली आहे , त्याने देखील निंबाळकर यांना ज्या प्रकारची मदत मिळाली आहे तशी मदत मला मिळावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे . यापुढे जे-जे अधिकारी लाचलुचपत व अन्य गुन्ह्यात खटला लढवतील ते देखील खटले लढविण्यासाठी मनपाकडून आर्थिक मदत मागतील , ही चुकीची प्रथा पडेल अशी टीका समाजसेवक राजू गायकवाड यांनी केली आहे . तर एट्रोसिटीच्या गुन्ह्यात असलेल्या निंबाळकर यांना खटला लढविण्यासाठी जे जे आर्थिक मदत करतील त्यांना सहआरोपी केले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *