भाजप आणि उद्धव ठाकरे हेच सरकारचे लाभार्थी
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
नागपूर : भाजप-शिवसेना सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारची कामगिरीच शून्य असल्यामुळे त्यांना ‘मी लाभार्थी’च्या फसव्या जाहिराती कराव्या लागत आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे हे दोघेच सरकारचे खरे लाभार्थी आहेत अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली.
विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रासमोर खरी आपत्ती ओखी वादळासारख्या अस्मानी संकटांची नाही, तर युती सरकारच्या सुलतानी संकटाची आहे. तीन वर्षात या सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले, त्याच्या तुलनेत ओखीमुळे झालेले नुकसान काहीच नाही. ओखी वादळ आणि युती सरकारमधील साम्य म्हणजे ही दोन्ही संकटे व्हाया गुजरात महाराष्ट्रामध्ये आली असा टोलाही त्यांनी लगावला. कर्जमाफी जाहीर झाल्यापासून दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कापसाच्या ४२ लाख हेक्टरपैकी साधारणतः ३० लाख हेक्टरवरील पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाले. अजून गेल्या वर्षीच्या सोयाबीनच्या नुकसान भरपाईचाच पत्ता नाही. एकिकडे ‘सामना’त अग्रलेख लिहायचा की, ‘देश खड्ड्यात जातोय’ आणि दुसरीकडे खड्डा खोदायच्या कामात शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदारांची रसद पुरवायची, असा शिवसेनेचा दुटप्पीपणा सुरू आहे असा आरोप पाटील यांनी केला.