आगरी समाजाचा झेंडा अयोध्देत फडकणार  !

डोंबिवलीतील हभप अनंतबुवा भोईर यांना गीतरामायण हिंदीतून सादर करण्याचा मान

डोंबिवली ( संतोष गायकवाड )   : तुझा सूर चांगलाय, तू गीतरामायण करू शकतो असा बाबुजींचा मिळालेला आशिर्वाद आणि त्यानंतर हभप अनंतबुवा भोईर यांनी सुरू केलेली गीतरामायणाची वाटचाल शतकापुढं गेलीय. डोंबिवलीतील  हभप वै सावळाराम म्हात्रे महाराज, हभप वासुदेव महाराज म्हात्रे यांच्याच पावलावर पाऊन ठेवीत, हभप अनंतबुवा भोईर यांनी आगरी समाजात वेगळा ठसा उमटवलाय. आता बुवांना अयोध्देत हिंदीतून गीत रामायण सादर करण्याचा मान मिळालाय. ११ व १२ फेब्रवारीला श्री अयोध्दा येथील कारसेवक पुरम येथे बुवा हिंदीतून गीतरामायण सादर करणार आहेत.  त्यामुळे आगरी समाजाचा झेंडा अयोध्देत फडकणार असून,  सांस्कृतीक व कलानगरी म्हणून ओळख असलेल्या   डोंबिवलीच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला जाणार आहे. या कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाताील संत महंत उपस्थित राहणार आहेत.

श्री रामदास मिशन युनिवर्सल सोसायटी यांच्यावतीने १३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१८ दरम्यान राम राज्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलय. यानिमित्ताने अयोध्देत ग.दी.माडगुळकर रचित गीतरामायण प्रथमच हिंदीतून सादर करण्याचा मान डोंबिवलीतील हभप अनंतबुवा भोईर यांना मिळालाय. तीन वर्षापूर्वीच बुवांनी अयोध्देत प्रथमच मराठीतून सुमारे पाचशे लोकांसह गीतरामायण सादर केले होते. मात्र राममंदिरचे अध्यक्ष जन्मेजय महंत शरणजी यांनी हिंदीतून गीतरामायण सादर करण्याची सुचना केली होती. त्या सुचनेनुसारच अयोध्देत हिंदीत गीत रामायण सादर होणार आहे. पंडीत रूद्रदत्त मिश्र व ज्येष्ठ हिंदी कवी  अलोक भट्टाचार्य यांनी गीत रामायण हिंदीत भाषांतर केलंय.  २००५ पासूनच बुवांनी गीतरामायणाला सुरूवात केली.  गीत रामायणात एकूण ५६ गीत आहेत. गीत रामायणात  लाईव्ह नृत्य हेच मुख्य वैशिष्ट आहे. विशेष म्हणजे  नृत्य कोरिओग्राफर हे केरळचे, निवेदक बंगालचे,  गायक मंडळी महाराष्ट्रातील आणि अनुदवादक उत्तरप्रदेशचे असा संगम गीत रामायणात साधला गेला.  अशी माहिती हभप अंनतबुवा भोईर यांनी सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना दिली.

हभप अनंतबुवा भोईर हे कल्याण डेांबिवली महापालिकेत नोकरीला आहेत. बुवा म्हणूनच ते सर्वत्र परिचित आहेत. गेली ३५ वर्षे ते गात आहेत. ठाणे व रायगड जिल्हयातील ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसाराचे काम ते करतात. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायतील मोठ नाव म्हणजे हभप वै  सावळाराम म्हात्रे महाराज.  हभप वै सावळाराम महाराज यांच्याशी लहानपणापासून सहवास होता.  गाण्याची व संगीताची आवड असल्याने त्यांच्याबरोबरच ते अनेक कार्यक्रमात जात. सावळाराम महाराजांमुळेच, बाबा महाराज सातारकर यांच्या सारख्या मोठे किर्तनकारांसमवेत संगीताची साथ करण्याची संधी मिळाल्याचे बुवा सांगतात.  तुंगारेश्वर येथे एका कार्यक्रमासाठी बुवा सावळाराम महाराजांबरोबर गेले होते. त्यावेळी बुवांना गात असतानाच, बाबुजीनी पाहिले होते. बाबजुनींना बुवांना जवळ बोलावून घेतले. तूझा सूर, ताल चांगला आहे. तू गीत रामायण करू शकशील असे सांगितले. मात्र त्यावेळी बाबुजींविषयी मला फारशी माहिती नव्हती. पण सावळाराम महाराजांनी सांगितले, बाबुजींनी आशिर्वाद दिलाय तू कर. त्यावेळी ग्रामीण भागात भजनी परंपराच होतीच. शास्त्रीय संगीताची जाण नव्हती. मात्र त्यानंतर बुवांनी पं. एस के अभ्यंकर व पं मधुकर जोशी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. पं सदाशिव पवार हे बुवांना त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यानंतर मात्र बुवांनी मागे वळून पाहिलेले नाही. बाबुजींचा आशिर्वाद मिळाला नसता तर मी गीतरामायण कधीच करू शकलो नसतो अशी आठवण बुवा सांगतात.  अयोध्देत गीत रामायण सादर केल्यानंतर २४ मार्चला राम राज्य संमेलन तिरूवनंतपुरम रामकंद परिक्रमा येथे बुवांचे गीतरामायण होणार आहे. केरळमध्ये पण पद्मनाभ मंदिरात  21ते 24  मार्चला गीत रामायण होणार आहे. गीत रामायणाच्या माध्यमातून रामकथा जगभर प्रचार प्रसार करण्याचा हेतू आहे. श्रीलंकेच्या अशोक वाटिकेत रामकथा करण्याचा मानस बुवांनी सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना व्यक्त केला.

संगीत नाटकातील पहिले आगरी कलाकार
बुवांचे वडील काशिनाथ भोईर हे शाहीर होते. वडीलांचाच वारसा ते पुढं चालवित आहेत. बुवांनी नाटय संगीतात काम केलयं. नाटय संगीतात काम करणारे आगरी समाजातील ते पहिलेच कलाकार ठरले आहेत. भालचंद्र पेंढारकर यांच्यामुळेच संगीत नाटकाकडे वळले.  बाळ करंदीकर, पं रामदास कामत, पं. नारायणराव बोडस पं सदाशिव बाकरे अशा बुजूर्गांकडून त्यांनी  संगीताचे शिक्षण घेतले. १९९१ साली विद्याधर गोखले लिखीत संगीत बावनखणी या संगीत नाटकाला राज्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. होणाजी बाळा, मत्सयगंधा सौभद्र, संशयकल्लोळ तर महाराणी पद्मिनी या नाटकाचे गद्याचे पद्यात रूपांतर करून संगीत नाटकात रूपांतर केले. संगीत प्रवासात बुवांना मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक निवृत्तीबुवा चौधरी महादेवबुवा शहाबाझकर शकुंनाथ बुवा पडघेकर श्याम बुवा खोडे यांची मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे बुवा सांगतात. मात्र बुवांचे मन फार काळ संगीत नाटकात रमले नाही. गोरगरीब विद्याथ्यांना शास्त्रीय संगीताचा परिचय व्हावा या हेतूने ते  सावळाराम महाराज संगीत कला अॅकडमी आणि स्व प्रल्हाद शिंदे संगीत अॅकडमीच्या  माध्यमातून विनामूल्य शिक्षण देत आहेत. ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात असा एकही उत्सव नाही की बुवांचे कार्यक्रम होत नाही. माजी आमदार रमेश पाटील, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांच्याकडून नेहमीच प्रेात्साहन मिळाल्याचे बुवा सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *