डोंबिवलीत लवकरच अल्प दरात अद्ययावत डायलिसिसची सुविधा
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे – गरजू रुग्णांना किफायतशीर दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून डॉ. शिंदे यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत डायलिसिस सेंटरला जागा उपलब्ध करून देण्यास कल्याण–डोंबिवली महानगरच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिलीय. कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डोंबिवली पूर्व येथील पी. पी. चेंबर्स येथील २५०० ते ३००० चौरस फूट जागा डायलिसिस सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभागृहनेते राजेश मोरे आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी यासंबंधीचा ठराव सभागृहात मांडला होता.
कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय येथे डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. खासगी रुग्णालयांमधील डायलिसिसचे दर परवडणारे नसतात. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी अद्ययावत डायलिसिस सेंटरसाठी खासदार निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी गेले दीड–दोन वर्षे पाठपुरावाही सुरू होता. सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर केला असून त्यानुसार जागा उपलब्ध होताच खासदार निधीतून डायलिसिसची मशिन्स आणि अन्य आवश्यक यंत्रणा खरेदी करून सहा महिन्यांत हे केंद्र गरजू रुग्णांसाठी खुले करण्यात येईल आणि अल्प दरात त्यांना डायलिसिसची सुविधा घेता येईल, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. या प्रयत्नांना साथ देणारे महापौर राजेंद्र देवळेकर तसेच महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.