इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम महिनाभरात सुरू होणार : मुख्यमंत्रयाची माहिती
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला राज्यपाल, मुख्यमंत्रांचे अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे.विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्रयानी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिलाय. संविधानामुळे शक्तीशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते. देशातील दिन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यत परिवर्तन करण्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शस्त्र दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.