ओखी वादळाच्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

भिवंडी :  भिवंडीसह ठाणे ,पालघर ,रायगड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा वीटभट्टीचा जोडधंदा आहे.या जिल्ह्यात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी पुरकधंदा म्हणून वीटभट्टीचा व्यवसाय  करतात.मात्र ओखी वादळाच्या कोकण किनार पट्टीवरील तडाख्याने ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.तर तालुका परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.या ओखीच्या पावसामुळे शेतकरी,वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ओखी वादळामुळे सोमवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून सायंकाळच्या सुमाराला झालेल्या जोरदार पावसाने अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा रात्रभर पावसाने झोडपले.तर मंगळवारी सकाळच्या सुमारास शहापुर,भिवंडी,मुरबाड या तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली.दोन ते अडीच तास कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसामुळे जनावरांच्या वैरणाचेही मोठे नुकसान झाले आहे.तसेच भाजीपाला व फळउत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.तर अनेक ठिकाणी मातीच्या कच्च्या विटांचा चिखल झाल्याने वीटभट्टी व्यावसायिकांचें लाखोंचे नुकसान झाले.दिवाळीच्या कालवधीत पडलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे एकीककडे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात  झालेल्या नुकसानाला तोंड द्यावे लागले आहे.तर दुसरीकडे शेतकरी असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे.एरव्ही दिवाळीनंतर सुरू होणारे विटांचे उत्पादन आता या ओखीच्या पावसामुळे विटांच्या उत्पादनावर पूर्णतः परिणाम झाला आहे.यामुळे ओखीच्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या वीटभट्टी लघु उद्योजकांना आता शासनाने मातीची रॉयल्टी माफ करून सहाय्य करावे अशी मागणी वीटभट्टी उद्योजकांनी केली आहे.दरम्यान वीटभट्टीवर काम करण्यासाठी वाडा,जव्हार,मोखाडा,तलासरी ,डहाणू शहापूर,नाशिकच्या ग्रामीण भागातून शेकडो आदिवासी मजूर या वीटभट्ट्यांवर काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत .मात्र या अवकाळी पावसामुळे आदिवासींच्या झोपडयांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!