भिवंडीत मुस्लिम बांधवांची ईदमिलादुनबी उत्साहात साजरी 
भिवंडी : शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादुनबी या उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढुन इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जय जयकार करून मानवजातीच्या कल्याणासाठी सामुहीकरीत्या कोटरगेट मशिदीत नमाज अदा करून सुखशांतीसाठी दुवा मागितली.शनिवारी सायंकाळी कोटरगेट मशीद येथून निघालेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी ‘ नारे ए तकदीर अल्ला हो अकबर ‘ अशा गगनभेदी घोषणा देत भव्य मिरवणूक काढली होती.

भिवंडी शहरातील सन १९७० च्या जातीय दंगलीनंतर राज्य सरकारने जाहीर मिरवणुकीस बंदी घातली होती. त्यानंतर रजा अकॅडमी या संघटनेने प्रयत्न केल्याने तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी भिवंडीतील ईदमिलादुनबी मिरवणुकीस परवानगी दिली आहे.तेव्हापासून सलग १३ वर्षे शांततेत मिरवणूक निघत आहे.या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्था व मुस्लिम बांधवांनी पुष्पगुच्छ देवून शांती व एकात्मतेचा संदेश दिला.हा दिवस जगभरात शांतीदिवस म्हणून पाळला जात आहे.मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.ईद ए मिलाद हा पैगंबर मोहम्मद यांचा जन्म दिवस असल्याने भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातील मशिदींमध्ये दोन दिवसांपासून नमाजासह विविध धार्मिक प्रवचन,फोटो प्रदर्शन,मोहम्मद पैगंबरांच्या जिवनावर आधारीत माहिती ,शांतीअमन संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शहरातील प्रसिद्ध कोटरगेट मशिदीला विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्याने हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी मुस्लिम बांधवांसह विविध जाती धर्माचे नागरिक मशिदीजवळ थांबून दृश्य डोळ्यांमध्ये सामावून घेत होते.मुस्लिम बांधवांच्या शांतीप्रिय सणामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.रजा अकॅडमीच्यावतीने कोटरगेट मशिद येथे फुल व विद्युत रोषणाईने सजविलेल्या घोडागाडीत लखनौ येथील मौलाना हजरत मौलाना मक़सूद अली खान विराजमान होताच मिरवणूक प्रमुख शकील रजा यांनी मौलाना मकसूद खान यांना पुष्पहार घालुन त्यांचे स्वागत केले.त्यानंतर पै.मोहम्मद यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत मिरवणूकीस सुरुवात झाली.या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू ,महापौर जावेद दळवी ,शांतात समितीचे गोपाल सिंग ,शरद भसाळे ,वसीम खान ,भाजपचे अनिल गायकवाड ,सुजाउद्दीन अंसारी ,तारिक फारुकी ,ऍड. यासिन मलिक ,गुलाम गौस ,एजाज खान ,लतीफ बाबा ,शाकीर आदीबी आदींसह सुमारे २ लाख मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.या मिरवणुकीत चाँदतारा असलेले हिरवे ,भगवे झेंडे घेवून बेफामपणे नाचत मुस्लिम युवक बांधवांनी आपला आनंद साजरा केला.कोटरगेट,निजामपुरा, वंजारपटी नाका या मार्गे निघालेली मिरवणूक रात्रौ उशिराने चाविंद्रा मिल्लतनगर येथील मामा भांजा दरगाह येथे पोहचून सार्वजनिक नमाज अदा करून समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *