भिवंडीत बेकायदेशीररित्या बैलांच्या झुंजी : पहिल्यांदाच २० जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी : तालुक्यातील सोनाळे येथे बेकायदेशीररित्या बैलांच्या झुंजीचे आयोजन करून या झुंजीत बैलांना निर्दयीपणे वागणूक दिल्याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात आयोजकांसह २० जणांवर प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक किसन पाटील आणि छोट्या सुकऱ्या पाटील (रा.सोनाळे) असे गुन्हा दाखल केलेल्या मुख्य आयोजकांचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी प्रत्येकी ५० हजार किमंतीच्या दोन बैलांसह या बैलांची वाहतूक करणारी एक बोलेरो जीप व एक टेंपो असा तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यात पहिल्यांदाच बेकायदेशीररित्या बैलांच्या झुंजी लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज्यशासनाची बैलांच्या झुंजीना कडक बंदी असताना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावानजीकच्या विठ्ठल मंदिरासमोरील नदी किनाऱ्यावरील मोकळया जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.ना.सचिन भाट यांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत घटनास्थळी जावून पुरावा म्हणून मोबाईलमध्ये बैलांच्या झुंजीचे चित्रीकरण करून पुढील कारवाईसाठी बिनतारी संदेश पाठवला.त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील,पोह. बापूराव तोडासे ,सैयद तडवी ,विठ्ठल जाधव ,पोना. भरत शेगर ,दिनेश पाटील आदींचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पोलिसांना पाहून आयोजकांसह झुंजी लावणाऱ्यांनी बैल घेवून पळ काढला.या पळापळीत पोलिसांनी घटनास्थळावरून झुंजीसाठी आणलेले प्रत्येकी ५० हजार किमंतीच्या दोन बैलांसह या बैलांची वाहतूक करणारी एक बोलेरो जीप व एक टेंपो असा तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या बैलांना अंनगाव येथील गौशाळेत जमा करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील करीत आहेत.