डोंबिवली (प्रतिनिधी) – कल्याण पूर्वचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीटमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलगा वैभव गायकवाड याचे नाव वगळण्यात आले आहे. वैभव गायकवाड विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वैभव गायकवाड निर्दोष? पोलिसांचा दावा

गेल्या वर्षभरापूर्वी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड अद्याप तुरुंगात असून, त्यांच्यासह काही इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणात गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले होते.

मात्र, नुकत्याच सादर झालेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये वैभव गायकवाड यांचे नाव वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले की, गोळीबाराच्या घटनेत वैभव गायकवाड यांचा थेट सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच, गोळीबार होण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्याबाहेर पडले होते, हे सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाल्याने त्यांचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महेश गायकवाड नाराज; उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

दरम्यान, या निर्णयावर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “माझ्यावर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला, त्यात वैभव गायकवाड याचा सहभाग होता. तो सीसीटीव्हीमध्ये दिसतो आणि त्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र, राजकीय दबावामुळे पोलिसांना कारवाई करता आलेली नाही.”

महेश गायकवाड यांनी पुढे सांगितले की, “पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे कारवाई होत नाही. त्यामुळे मी कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.”

गणपत गायकवाड तुरुंगात, पण गायकवाड कुटुंबाचा प्रभाव कायम

गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून तिकीट दिले. महेश गायकवाड यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली, मात्र सुलभा गायकवाड यांनी विजय मिळवत कल्याण पूर्वमधील गायकवाड कुटुंबाची सत्ता कायम ठेवली.

या प्रकरणी पुढील कायदेशीर लढाईत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!