दिव्यांगांना मिळाला रेल्वे पोलिसांचा मदतीचा हात
घाटकोपर ( निलेश मोरे ) : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सर्वत्रच साजरा केला जातो पण आजच्या दिवशी रेल्वे स्थानकावर वेगळं चित्र पाहावयास मिळालं. घाटकोपर आरपीएफ पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींना आरक्षित असलेल्या रेल्वे डब्यात चढण्यासाठी मदतीचा हात देत, खाकी वर्दी मध्ये असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवले. दिव्यांगासाठी आरक्षित असलेल्या डब्यातून कृपया प्रवास करू नका या रेल्वे प्रशासनाच्या सुचनेकडे वारंवार दुर्लक्ष करीत धडधाकट प्रवासी दिव्यांगाच्या डब्ब्यातून प्रवास करतात. मात्र आज जागतिक दिव्यांग दिनी रेल्वे पोलिसांनी थेट दिव्यांगांच्या मदतीला येत त्यांना दिलासा दिला . दिव्यांगांच्या डब्ब्यातून प्रवास करू नका अशा उद्घाेषणा रेल्वे पोलिसां कडून करण्यात आल्या . आरपीएफ पोलिसांनी यावेळी घाटकोपर , विक्रोळी दरम्यान दिव्यांग डब्याची तपासणी केली असता अन्य प्रवासी या डब्यातून प्रवास करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले . पोलिसांनी या प्रवाशांना खाली उतरवत अन्य सामान्य डब्यातून प्रवास करण्यास भाग पाडले . आरपीएफ पोलिसांच्या या सहकार्याने दिव्यांगानी पोलिसांचे आभार मानले .
दिव्यांग सन्मान अभियानाचे आयोजन
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज घाटकोपर स्थानक येथे भारतीय मानवतावादी पार्टी संलग्न भारतीय रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने दिव्यांग सन्मान अभियानाचे आयोजन करण्यात आले . रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 , 2 , 3 व 4 वर प्रवाशांना दिव्यांगाना सहकार्य करा असे आवाहन करत दिव्यांग व्यक्तींना गुलाब पुष्प देऊन त्यांचा रेल्वे प्रवासी संघाकडून सन्मान करण्यात आला . दिव्यांग हे सुद्धा आपल्यातील एक घटक आहेत . दिव्यांग असताना देखील त्यांची कामाची धडपड आणि जिद्द पाहून त्यांचा आपण गौरव केला पाहिजे . अशा वेळी दिव्यांगाना त्यांच्या आरक्षित डब्यातूनच प्रवास करू द्या . संघटनेचे निलेश जाधव व नागेश शिर्के यांनी या अभियानाचे आयोजन केले होते .