हत्येप्रकरणी गवळी दाम्पत्य अटकेत ; आरोपी पेहराव बदलून पळण्यापूर्वीच विशालला पोलिसांनी ठोकल्या शेगाव येथून बेड्या

डोंबिवली: ता :२५:(प्रतिनिधी):-
येथील चक्कीनाका भागातील एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार विशाल गवळी यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून, तर त्यांची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण शहरातून अटक केली आहे. अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली.
या हत्येप्रकरणी कल्याण शहर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना सांगितले, अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा सीसीटीव्ही चित्रणातील माहितीच्या आधारे सहा पोलीस पथकांच्या साहाय्याने तपास सुरू आहे. या प्रकरणात विशाल गवळी याला बुलढाणा शेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला संध्याकाळपर्यंत शहरात आणून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल. या गुन्ह्यात विशालच्या पत्नीच्या सहभागाचा विचार करून पत्नी साक्षी यांनाही अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी आहेत का, यादृष्टीने सीसीटीव्ही चित्रणाचे आधारे शोध घेतला जात आहे. एक रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे.

विशाल सराईत गुन्हेगार

विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी दोन प्रकरणात त्याला तडीपाराची शिक्षा झाली होती. अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता, असे पोलीस सुत्राने सांगितले.विशालची यापूर्वी दोन लग्ने झाली आहेत. कल्याण पूर्वेत त्याची दहशत आहे.

पेहराव बदलण्याचे नाट्य

अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहचला. या भागात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे. तेथे तिचे नातेवाईक राहतात. कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्यप्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर विशाल बुलढाणा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची पथके बुलढाणा येथे त्याचा शोध घेत होते.

केशकर्तनालयात दाढी

विशालला दाढी आहे. आपण कोणाला ओळखू नये म्हणून विशालने बुलढाणा येथे एका केशकर्तनालयात दाढी केली. त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पथकांनी त्याच्यावर बुधवारी सकाळी झडप घातली, असे पोलीस सुत्राने सांगितले.

——

कल्याण पूर्व चक्कीनाका येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवळीला बुलढाण्यातील शेगाव येथून ताब्यात घेतले आहे. त्याची पत्नी साक्षी यांना अटक केली आहे. या प्रकरणात अन्य काहींचा सहभाग आहे का यादृष्टीने तपास केला जात आहे. सहा पथके याप्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

अतुल झेंडे-पोलीस उपायुक्त, कल्याण.

——–

जे काय कलम आहे ते लावून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. त्याला फाशी कशी होईल यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न आहे आणि ते कोर्टामध्ये केले जाते . पोलिसांनी त्याला अटक करून या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे .सरकारकडून पूर्ण प्रयत्न त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केले जातील आणि शंभर टक्के फाशी यात होईल.
कल्याण लोकसभा खासदार – श्रीकांत शिंदे.

——


आरोपी महिलेला दोन दिवसांची पोलीस कुठली

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी साक्षी गवळी हिला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

—–

आरोपी पत्नीच बनली माफीची साक्षीदार, पोलिसांनी उकलला हत्येचा गूढ

कल्याण पूर्वेतील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीने महत्त्वाची साक्ष दिल्यामुळे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गवळीने पीडित मुलीला आपल्या घरात आणून तिच्यासोबत गैरकृत्य केल्यानंतर तिची हत्या केली.

गुन्ह्याचा तपशील

घटनेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विशाल गवळीने मुलीला घरात आणले. त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केले व तिची हत्या केली. मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये लपवून ठेवला. विशालची पत्नी साक्षी, जी बँकेत नोकरी करते, ती संध्याकाळी सात वाजता घरी आली. पतीने घडलेली घटना तिला सांगितली. हे ऐकून साक्षी हादरली, मात्र त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह नष्ट करण्याचा कट रचला.

मृतदेह नष्ट करण्याचा कट

दोघांनी घरातील रक्त स्वच्छ केले. रात्री ८.३० वाजता विशालने आपल्या मित्राची रिक्षा बोलावली व मृतदेह बॅगसह रिक्षात ठेवला. ९ वाजता बापगाव येथे पोहोचून त्यांनी मृतदेह फेकून दिला. घरी परतताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली व पत्नी साक्षीला घरी सोडून स्वतः तिच्या गावी बुलढाणा – शेगाव येथे निघून गेला.

पोलिस तपास व आरोपीची अटक

घटनेनंतर घराजवळ सापडलेल्या रक्ताच्या पुराव्यांवरून पोलिसांचा संशय विशालवर गेला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी बुधवारी सकाळी शेगाव येथील एका सलूनमध्ये कारवाई करून विशालला ताब्यात घेतले.
दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू ठेवली असून, न्यायालयात साक्षीदार म्हणून पत्नी साक्षीला पुढे करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!