मुंबई, 18 डिसेंबर : मुंबईच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे.मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात आज दोन बोटींचा अपघात झाला आहे. या अपघातात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी उलटली आहे.या बोटीत ३० हून अधिक प्रवासी होते. दरम्यान, बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले मदत व बचावकार्य सुरु झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून नीलकमल नावाची फेरीबोट एलिफंटा लेण्यांकडे प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी उरणजवळ कारंजा पोहोचताच दोन बोटींची धडक झाली. यात नीलकमल ही बोट उलटली. या बोटीत अंदाजे ३० ते ३५ प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचावकार्य चालू आहे. ही बोट उलट्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या जीवरक्षकाकडून तातडीने प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. एलिफंटाकडे दररोज पर्यटकांचा ओढा असतो. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक एलिफंटा या ठिकाणी जात असतात. दरम्यान, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.