डोंबिवली, ता ; 11 (प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. नागरिकांनी बेकायदा इमारतींतील घर खरेदी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या आणि महारेराच्या संकेतस्थळांचा आधार घ्यावा, असे आवाहन नगररचना विभागाचे प्रभारी-साहाय्यक संचालक सुरेंद्र टेंगळे यांनी केले आहे.

पालिकेच्या संकेतस्थळावर नगररचना विभागाने मंजूर केलेल्या इमारतींविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचे दाखले (Occupancy Certificate) यांचा समावेश आहे. हीच माहिती महारेराच्या संकेतस्थळावरही नागरिकांसाठी उपलब्ध आहे.


बेकायदा बांधकामांची समस्या

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे दोन लाखांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी आहेत. या बांधकामांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून बांधकाम धारक नागरिकांची फसवणूक करतात. 22 ते 25 लाख रुपयांमध्ये घरे विकली जात असून, अनेक नागरिक या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत.

डोंबिवलीत सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 बेकायदा इमारती पाडण्याची मोहीम सुरू आहे. यातील 58 इमारतींमध्ये लोक राहत असल्याने या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.


आता घर खरेदी अधिक सुरक्षित

पालिकेने मंजूर केलेल्या इमारतींच्या कागदपत्रांवर क्युआर कोड उपलब्ध करून दिला आहे. नागरिक घर खरेदी करण्यापूर्वी या कोडद्वारे कागदपत्रांची सत्यता तपासू शकतात. यामुळे पालिकेत न जाता घरी बसूनच संबंधित इमारतीच्या अधिकृततेबाबत नागरिकांना माहिती मिळू शकते.


बेकायदा बांधकामांसाठी तडजोड योजना

बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 154 नुसार 15 मार्च 2024 पर्यंत तडजोड शुल्क निश्चित करण्यात आले आहे. संबंधित बांधकामधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह पालिकेच्या नगररचना विभागात अर्ज दाखल केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


“पालिका हद्दीत घर खरेदी करताना नागरिकांनी पालिका व महारेराच्या संकेतस्थळावर कागदपत्रे तपासावीत. ही माहिती तपासल्यामुळे नागरिक बेकायदा इमारतीतील घर खरेदीच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहतील.”
– सुरेंद्र टेंगळे,
प्रभारी-साहाय्यक संचालक, नगररचना विभाग, कडोंमपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!