डोंबिवली, दि. २३ (प्रतिनिधी):
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीत महायुतीच्या भाजप उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी 81 हजार 516 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी, शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांना 55 हजार 108 मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांना 39 हजार 512 मते मिळवता आली.

सुलभा गायकवाड यांनी या निवडणुकीत 26408 मतांची आघाडी घेत तिरंगी लढतीत आपला विजय निश्चित केला. या विक्रमी यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

सुलभा गायकवाड यांचे विजयानंतरचे वक्तव्य:
“कल्याण पूर्वेतील माझ्या सर्व मतदार बंधू-भगिनींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम माझ्यासाठी अमूल्य देणगी आहे. या विजयाने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे, आणि मी जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन,” असे त्यांनी म्हटले. भविष्यातील कामांमध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर राहील, असा निर्धार व्यक्त करत आमदार सुलभा गायकवाड यांनी मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानले.

विजयानंतरचा जल्लोष
सुलभा गायकवाड यांच्या विजयाच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील रस्त्यांवर भव्य मिरवणुकीचे आयोजन केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संपूर्ण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!