कल्याण, ता. १७ (प्रतिनिधी):
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांनी आज सकाळी काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. बासरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र आदरांजली वाहिली.
हे स्मारक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतीक म्हणून उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, भारतातील बाळासाहेबांचे पहिले स्मारक म्हणून याचे महत्त्व अधिक आहे. बासरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्मारक उभारले गेले आहे, ज्यामुळे कल्याणमधील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे.
या प्रसंगी बोलताना सचिन बासरे म्हणाले, “बाळासाहेब आज प्रत्यक्ष आमच्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचे व आशीर्वादाचे भक्कम आधार आजही आमच्यासोबत आहे. पुतळ्याच्या रूपाने बाळासाहेब आम्हाला प्रेरणा देत आहेत. येणाऱ्या निवडणुकीच्या लढाईत त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी जिंकण्याचे बळ ठरणार आहे.”
स्मारकावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी या ठिकाणी येऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बाळासाहेबांच्या विचारांचा जागर केला.
सचिन बासरे यांचे हे भावनिक वक्तव्य आणि बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये निवडणुकीसाठी नवीन जोश संचारला आहे. कल्याण पश्चिममधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून, बासरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठाच्या प्रचाराला वेग मिळाला आहे.
———