कल्याण, ता. १७ (प्रतिनिधी):
कल्याण पश्चिममध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असून, या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी महिलांनी एकत्र येत आपला निर्धार व्यक्त केला आहे.
हा मेळावा गीता हॉल, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम येथे पार पडला. विशेष म्हणजे, या मेळाव्याचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य भारत जोडो अभियानाच्या समन्वयक उल्काताई महाजन यांनी केले. उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सचिन बासरे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांच्या महिला सुरक्षेसाठीच्या वचनावर विश्वास व्यक्त केला.
मेळाव्यात बोलताना उल्काताई महाजन म्हणाल्या, “कल्याणमधील महिलांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची आज महत्त्वाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी बासरे यांच्या नेतृत्वाखाली ठोस निर्णय घेतले जातील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
यावेळी सचिन बासरे यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. महिलांच्या शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिला सुरक्षेसाठीचे ठोस धोरण हे त्यांच्या निवडणूक अजेंड्याचा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याला उपस्थित महिलांनी आगामी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमांक १ मशाल चिन्हासमोरील बटण दाबून बासरे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महिला सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा टप्पा ठरला असून, यामुळे कल्याण पश्चिममध्ये सकारात्मक बदलाची दिशा ठरेल, अशी अपेक्षा आहे.
——