डोंबिवलीत महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल
डोंबिवली , ता:१६:(प्रतिनिधी)
“आत्ताचा भाजप हा निष्ठा आणि स्वाभिमान हरवलेला, संकरित भाजप आहे. लोकांची घरं फोडणाऱ्या आणि पेटवणाऱ्या भाजपच्या गर्भात आता इतर पक्षांची बीजं रुजली आहेत,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे (डोंबिवली) आणि सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेसाठी मंचावर शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, महिला संघटिका वैशाली दरेकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, संतोष जाधव, प्रकाश वाणी यांच्यासह, शहर प्रमुख अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे, विलास म्हात्रे,काँग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वंडार पाटील, जयेश म्हात्रे, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, आणि रश्मी ठाकरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष्य केले.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरं सोडून, अविवाहित राहून भाजप उभारला. पण आत्ताच्या भाजपने संघालाही दूर केलं आहे. नड्डा म्हणतात, ‘आम्हाला संघाची गरज नाही.’ मग कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले ते याच संकरित भाजपसाठी का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत या पिता पुत्रांवर जोरदार टीका करत ठाकरे म्हणाले, “ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील खड्डे, रस्ते, नागरिकांच्या समस्या कायम आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी मुलाला खासदार बनवण्यासाठी या समस्या सोडविण्यात गद्दारांनी रस घेतला नाही. खोक्यांच्या जोरावर हे गद्दार मोठमोठी होर्डिंग्ज लावून विकासाचा दावा करतात. पण आता लोकांनी त्यांना त्यांच्या जागेवर बसवायची वेळ आली आहे.”
“भाजपचे हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणारं आहे, पण शिवसेनेचे हिंदुत्व चुली पेटवणारं आहे. आमचं हिंदुत्व हाताला रोजगार देणारं, आणि जनतेला आधार देणारं आहे. गद्दारी भाजपसोबत नव्हे, तर शिवाजी महाराजांच्या भगव्याशी झाली आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योग, जमिनी अदानींकडे गेल्याचा आरोप करत, “महाराष्ट्राचे नाव आता अदानीराष्ट्र करणार आहात का? गुजराती-मराठी लोकांमध्ये भिंत बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होईल,” अशी भीती व्यक्त केली.
“विकासाच्या नावाखाली फक्त ठेकेदारांच्या घरांत संपत्ती भरली गेली. ठाणे आणि डोंबिवलीच्या पालिका लुटल्या. आता मुंबई पालिकेवर डोळा आहे. पण एकदा राज्याचा कारभार हाती आला, तर यांना खडी फोडायला लावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला.
राज्यात अंधार आणि बजबुरी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
“आमचं निष्ठेचं हिंदुत्व शिवाजी महाराजांच्या भगव्याशी आहे. दिल्लीश्वरांनी अनेकदा आमच्यावर हल्ला केला, पण आम्ही डगमगलो नाही,” असे सांगून त्यांनी उपस्थितांना आपल्या मतांचा प्रभाव दाखवण्यासाठी आवाहन केले.
या सभेत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाने महाविकास आघाडीच्या प्रचाराला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. ठाकरे यांच्या प्रत्येक शब्दावर उपस्थिततांकडून जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या जात होत्या. यावेळी मैदानात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती आणि संपूर्ण वातावरण भगवंत झालं होते.
———