कल्याण, दि. १० (प्रतिनिधी) :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या प्रचार मोहिमेअंतर्गत बासरे यांच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी मतदारसंघातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. त्या म्हणाल्या, “कल्याण पश्चिमेला सततच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती मी स्वतः अनुभवली आहे. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी सचिन दिलीप बासरे हे सक्षम नेतृत्व आहे.”
पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत सांगितले की, “सत्तांतरानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी नियुक्त केले आहेत. याशिवाय, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.” तसेच, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर निशाणा साधत त्या म्हणाल्या, “जे ‘जे बाटेंगे, तो कटेंगे’च्या घोषणा देतात, ते स्वतःच्या भावासोबत राहू शकत नाहीत. अशा लोकांनी महाराष्ट्रात येऊन जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.” मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणाल्या, “कल्याण पश्चिमेतील जनतेनी यंदा स्पष्ट भूमिका घेऊन मतांचे विभाजन टाळावे. त्यामुळे विकासाचा मार्ग प्रशस्त होईल.”
सचिन बासरे यांनी मतदारसंघातील प्रमुख समस्यांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अल्ताफ शेख, विधानसभा संघटक किशोर शुक्ला, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवी कपोते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश बोरगावकर, जिल्हा सचिव ॲड जयेश वाणी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीने कल्याण पश्चिमेतील समस्या सोडवण्यासाठी सशक्त योजना तयार केली असून, यावेळी मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
——