डोंबिवली, ता :8 (प्रतिनिधी)
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सतर्क असून मतदारसंघात 75% पेक्षा अधिक मतदान होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी केले. मतदारांना सोयीसुविधा देण्यावर भर देत, त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध सुविधांचे आश्वासन दिले आहे.
मतदान केंद्रांवर विशेष सुविधा आणि अभिनव संकल्पना
मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रांवर फोन नेण्यास मनाई केली जाईल. कल्याण ग्रामीण मतदारसंघात पिंक बुथ, सक्षम बुथ, युथ बुथ, आणि युनिक बुथ या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, ज्यामुळे मतदारांना सोयीसुविधा मिळतील. याशिवाय, शेड, महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे, स्वयंसेवकांच्या मदतीसह रांगेची व्यवस्था, तसेच जलपानाची सोय करण्यात येणार आहे. मतदारांच्या जनजागृतीसाठी भित्तीपत्रके देखील लावण्यात येणार असून त्यात मतदारांच्या छायाचित्रांचा समावेश असेल.
गृहभेटीद्वारे मतदान आणि तक्रार निवारण
85 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या 29 ज्येष्ठ नागरिक आणि 5 दिव्यांग मतदारांसाठी 10 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी जाऊन गृहभेटीद्वारे मतदानाची सोय करण्यात आली आहे. तक्रारींचे तत्पर निवारण करण्यासाठी सी-व्हिजील ॲपद्वारे आलेल्या एकूण 17 तक्रारी 49 मिनिटांच्या सरासरी कालावधीत निकाली काढण्यात आल्या आहेत.
ईव्हीएम तयारी आणि मतमोजणी
ईव्हीएम मशीनची तयारी 11 व 12 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण 13 नोव्हेंबर रोजी घेतले जाईल. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली (पूर्व) येथे होईल.
“HAPPY VOTING” संकल्पना कार्यान्वित करण्याचे आश्वासन
भारत निवडणूक आयोगाच्या “HAPPY VOTING” या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी प्रतिपादन केले.
—–