‘ त्या ‘ तरुणांनी दिव्यांगापुढं केला आदर्श उभा
महाड ( निलेश पवार) : शिक्षण असतानाही नोकरी नाही. त्यातही शारीरिक अपंगत्व. हाताशी पैसेही नाही. मात्र अश्याही परिस्थितीत अपंगत्वावर मात करीत महाड मधील दोन तरुणांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करीत, दिव्यांग तरुणांपुढं आदर्श उभा केलाय. मुबीन आणि मोईन अशी दोघा तरुणांची नावे आहेत.
महाड तालुक्यातील खुटील या दुर्गम गावातुन महाड शहरात येऊन भाडे तत्वावर गाळा घेऊन व्यवसाय करणे आजच्या घडीला तरुणांना कठीण होऊन बसले. मुबीन आणि मोईन यांनी स्टेशनरी आणि डी टी पी व्यवसाय सुरू केलाय. मोईन हजवाणे हा वय वर्ष पस्तीशीतला तरुण संदेरी या गावातून महाडमध्ये आला. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मोईन ला उभे देखील राहता येत नाही. मात्र त्याच्या जिद्दीने त्याला अभिमानाने उभे केले आहे. एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मुईन हजवाणे याने १२ वर्षापूर्वी त्याने आपले डीटीपी चे दुकान सुरु केले. या माध्यमातून त्याने आपला व्यवसाय सुरु केला. आता त्याने आपल्या दुकानात आणखी दोन तरुणांना रोजगार दिलाय. मोईन याने संगणक शिक्षण देखील घेतले आहे.
मुबीन हा देखील विशीतला तरुण खुटील गावातून महाडमध्ये आला. जन्मताच एक हात अपंग. केवळ एक हातानेच व्यवस्थित काम करता येते. अशा अवस्थेत त्याने स्टेशनरी दुकान सुरु केले. समाज कल्याण आणि बीज भांडवल योजना आणि अपंग बचत गटातून मदत घेत मुबीन याने आपल्या व्यवसायाची सुरवात केली. मुबीन याचा भाऊ कादिर हे देखील त्याला या दुकानात सहकार्य करत असतात. वडील शेतकरी असताना देखील त्याने उचललेले हे पाउल प्रेरणादायी आहे. आज त्याच्या दुकानांत दोन कामगार काम करत आहेत. मुबीन आणि मुईन यांच्या प्रमाणे आपले अपंगत्व विसरून स्वतच्या पायावर उभे राहिले पाहिजे.
Hats off to these brave boys.