म्हाडा आणि खाजगी विकासाच्या माध्यमातून भव्य गृह संकुलाचे काम : मुंबईचे गिरणी कामगार शेलु गावात विसावणार
कल्याण: ता :०७:(प्रतिनिधी):-
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शेलु गावाच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी भव्य गृह संकुल उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात या गृह संकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे, ज्यामुळे जवळपास ३० हजार गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार आहे.
गिरणी कामगार घरकुल योजनेची पार्श्वभूमी
१९८२ मध्ये मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये तीव्र संप झाल्यामुळे गिरण्या बंद पडल्या, आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. त्यानंतर या कामगारांनी अनेक हालअपेष्टांचा सामना केला. गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने खासगी विकासकांच्या सहकार्याने ‘गिरणी कामगार घरकुल योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत शेलु येथे जागा निश्चित करण्यात आली आहे, जिथे म्हाडा आणि खाजगी विकासक यांच्या भागीदारीने गृह संकुलाचे काम सुरू होणार आहे.
संघटनांचा सहभाग आणि मंजुरी
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, रयतराज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, आणि सेंच्युरी मिलकामगार एकता संघ या प्रमुख गिरणी कामगार संघटनांनी शेलु येथील ‘कर्मयोगी एव्हीपी रियाल्टी’ या जागेची पाहणी केली आहे. त्यांनी या जागेला मान्यता दिली असून म्हाडा आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडे पत्राद्वारे मान्यता पत्र दिले आहे.
स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर
गिरणी कामगार गृह संकुलासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उल्हास नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठीची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग आणि सरचिटणीस प्रवीण येरुणकर यांनी दिली.दरम्यान या नवीन संकुलामुळे अनेक गिरणी कामगारांना आपले स्वप्न साकार साखर होऊन त्यांना लवकरच हक्काचं घरे मिळणार हे मात्र नक्की.
—–