डोंबिवली, ता. 04 (प्रतिनिधी) –
महाराष्ट्राला देशाला विचार देणारे राज्य म्हणून पाहिले जात होते. मात्र आज महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती टिकली आहे का, याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या राज्याने इतक्या खालच्या थराचे राजकारण कधीही पाहिले नव्हते, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांकडे कोणाचेच लक्ष नाही, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
राज ठाकरे यांनी एका प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. शिंदे यांच्या प्रचार सभेत भोजपुरी गाण्यावर एका महिलेला नाचवले जात आहे. याला ते महाराष्ट्राची संस्कृती मानतात का? ही उत्तरप्रदेश आणि बिहारची संस्कृती आहे, असे ठासून सांगत राज ठाकरे यांनी शिंदे यांना याबाबत विचार करण्याचे आवाहन केले.कल्याण ग्रामीण मतदारसंघातील प्रचार सभेत त्यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली.मनसे आमदार राजू पाटील यांची जाहीर सभा डोंबिवली पूर्व येथील पी एन टी कॉलनीत पार पडली.त्यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते आज फोडण्यात आले.
राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हांवर बोलताना सांगितले की, शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच आहे, ते एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांचे नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह अजित पवार यांचे नसून पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचेच असल्याचे ते म्हणाले.
“मला शिंदे बाप-बेट्यांची दानत माहिती आहे” – राजू पाटील यांचा आरोप
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार आणि आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला, हे त्यांच्या सूडबुद्धीचे राजकारण आहे," असे पाटील म्हणाले.मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगितले की, इथं आपल्या विरोधात शिंदे गट उमेदवार देणार आहे. मला या शिंदे बाप- बेट्याची दानत माहिती आहे, जे स्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज साहेबांचे काय होणार, असे म्हणत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार आणि आमदार राजू पाटिल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
राजू पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला पी एन टी येथील स्थानिक नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. सभेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. इथल्या सत्ताधाऱ्यांनी सर्व मैदाने बिल्डरांच्या घशात घातली आहेत. त्यामुळे सभा घ्यायला जागाच नाही. कोविडच्या काळात सध्याचे उमेदवार रेशनिंग दुकानातील तांदूळ घेऊन वाटत होते. तर सुभाष भोईर यांनी या भागात टोरंट कंपनी आणली. डायघरचा डंपिंग प्रकल्प आणला. 27 गावे महापालिकेत ढकलली. मात्र मी स्वखर्चातून मदत केली. स्वतः माझे रुग्णालय दिले, असे राजू पाटील यांनी म्हटले.
त्यानंतर राजू पाटील यांनी आरोप केला की, त्यांना गेल्या पाच वर्षांत शिंदे बाप-लेकांनी त्रास दिला आहे आणि आता माझ्या विरोधात उभे राहून सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. केडीएमसीच्या पाण्याच्या वाटपावरही त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “ठाण्याला पळवून न्यायला आलेले पाणी आमच्या हक्काचे आहे. हे चोरच आहेत, आमदार असो की मंत्री,” असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.