डोंबिवली, दि. ४ नोव्हेंबर (प्रतिनिधी):
भाऊबीज सणाच्या निमित्ताने खरेदी केलेली महत्त्वाची वस्तूंची बॅग विसरलेल्या एका महिलेच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करून, डोंबिवली पोलिसांनी अवघ्या तीन तासांत ती बॅग तक्रारदाराला परत केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी रोहिणी अक्षय चव्हाण (वय २४, रा. सर्वोदय नगर, अंबरनाथ प.) या डोंबिवली रेल्वे स्थानकातून सागाव, डोंबिवली येथे रिक्षाने जात होत्या. दरम्यान, त्या बॅग रिक्षामध्ये विसरून गेल्या. याप्रकरणी रोहिणी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लागलीच तक्रार दाखल केली.
सदर तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्याचे पोना. यल्लाप्पा पाटील आणि पोशि. घनश्याम ठाकूर यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षा आणि रिक्षाचालकाचा शोध घेतला. तीन तासांच्या आत रिक्षा मिळवून, त्यामधील हरवलेली बॅग सुरक्षित तक्रारदाराच्या हाती सोपवण्यात आली.
डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या हस्ते ही बॅग रोहिणी चव्हाण यांना परत देण्यात आली. पोलीस दलाच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास निर्माण झाला असून, अशा तत्पर कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
——–