डोंबिवली, दि. 03 (प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यात आज बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांची पूजा करण्याची प्रथा आहे. आजच्या दिवशी घरातील जनावरांचं पूजन करून त्यांना गवताच्या जळत्या पेंडीतून उड्या मारायला लावल्या जातात. यामुळे वर्षभर जनावरांचे आरोग्य चांगले राहते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच डोंबिवली शहर जवळ असलेल्या दावडी गाव आणि आडीवली ढोकाळी गावंमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गुरांची पूजा केली जाते. पावसाळ्यानंतर दिवाळीत शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते. दिवाळीच्या कालखंडात भात घरी येतो. यावेळी जनावरांची कामे पुन्हा एकदा सुरू होतात. त्यामुळेच जनावरांची दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी आंघोळ घालून पूजा केली जाते. त्यांना दिवाळीचा फराळ आणि गोडधोड भरवले जाते. त्यानंतर गावात गवताची पेंड पेटवून त्यावरून ही गुरं उडवली जातात. असे केल्यामुळे जनावरांच्या अंगावरील कीटक, जंतू मरतात आणि त्यांना कोणत्याही रोगाची लागण होत नाही. आगामी वर्षभर गुरांचे आरोग्य चांगले राहते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आणि प्रामुख्याने आगरी समाजात ही प्रथा पाळली जाते.