डोंबिवली, ता. 01 (प्रतिनिधी) –
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत 23 मे 2024 रोजी घडलेल्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या स्फोटामुळे नागरिक, व्यापारी, आणि उद्योजकांचे नुकसान झाले असून, त्यांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनाने पंचनामे केले. एकूण 995 पंचनाम्यांद्वारे नुकसानभरपाईची रक्कम 360,895,418/- (रुपये छत्तीस कोटी आठ लाख पंच्चाणव हजार चारशे अठरा) इतकी निश्चित करण्यात आली आहे. 14 जून 2024 रोजी हा अहवाल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पाठवण्यात आला असल्याचे कल्याण तहसीलदार कार्यालयाने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
प्रलंबित नुकसानभरपाईची वेळकाढूपणा? 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. त्यावेळीही पंचनाम्यांनंतर 7.5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडे पाठवली होती. परंतु आज आठ वर्षे उलटूनही पीडितांना ती नुकसानभरपाई मिळालेली नाही. प्रोबेस कंपनी स्फोटाच्या घटनेतील नुकसानभरपाई कधी मिळेल याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी तथा समाजसेवक राजु नलावडे यांनी माहिती मागवली होती.
“माहिती उपलब्ध होताच पुरविण्यात येईल” असे वेळकाढू उत्तर शासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे अमुदान कंपनी स्फोटप्रकरणातील नुकसानभरपाईलाही प्रोबेसप्रमाणेच लांबणीवर टाकले जाईल अशी चिंता स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
अमुदान कंपनी स्फोटानंतर नुकसानभरपाईचे स्वरूप अमुदान कंपनी स्फोटात 995 पंचनामे करण्यात आले होते, त्यातील 643 रहिवासी मालमत्ता पंचनामे (रक्कम 1,663,100/-), 980 वाणिज्य मालमत्ता पंचनामे (रक्कम 122,443,318/-) आणि 15 औद्योगिक आस्थापने पंचनामे (रक्कम 221,822,000/-) अशा स्वरूपात नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. स्फोटात मृत्यू झालेल्या 13 जणांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
प्रदूषण आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न कल्याण ग्रामीण मतदारसंघातील डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रदूषण आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 289 कंपन्या रेड संवर्गात धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने 171 कंपन्यांना सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण 460 कंपन्या धोकादायक असल्याने येथे प्रदूषण, स्फोटाची शक्यता आणि रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर हे गंभीर विषय आहेत.उमेदवारांची आश्वासने नागरिकांसाठी महत्त्वाची अमुदान आणि प्रोबेस कंपन्यांचे स्फोट तसेच प्रदूषणाच्या समस्येमुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण मतदारसंघातील सर्व उमेदवार हे प्रदूषण, सुरक्षेच्या उपाययोजना आणि नुकसानभरपाईसाठी कोणती ठोस आश्वासने देतात, हे स्थानिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
—-