उल्हासनगर , ता. 01 (प्रतिनिधी) –
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर विधानसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी नेमलेल्या भरारी पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक तपासणीमध्ये १७ लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे. या रोख रकमेसंदर्भात कोणताही वैध पुरावा नसल्याने ही कारवाई निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाची ठरली असून, आयकर विभागाच्या माध्यमातून तपासणी सुरु आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री साधारण २ वाजताच्या सुमारास भरारी पथकाला कल्याणकडून मुरबाडच्या दिशेने जात असलेले MH०५ DZ९९११ हे वाहन संशयास्पद वाटल्याने त्यास थांबविण्यात आले. वाहन थांबवून तपासणी केली असता, मोठी रोख रक्कम आढळली. आश्चर्य म्हणजे, वाहन चालकाकडे या रकमेसंदर्भात कोणताही वैध पुरावा नसल्याने ती रोख रक्कम त्वरित जप्त करण्यात आली. तपासणीच्या वेळी आढळलेल्या रोख रकमेची मोजणी केल्यावर ती १७ लाख रुपये असल्याचे समोर आले. जप्त केलेली रक्कम कोषागारात जमा करण्यात आली असून, याबाबतचा तपास आयकर विभागाला देण्यात आला आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून या रकमेसंबंधी सखोल तपासणी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे रोख रक्कम आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भरारी पथक क्र. ०६ ने कालच्या कारवाईत मिळवलेल्या यशामुळे आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यास हातभार लागला आहे. प्रशासनाने जनतेसह सर्व उमेदवारांना आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघ यांच्या कार्यालयाने या कारवाईची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली असून, या घटनेने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर भर देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!