डोंबिवली, ता. 01 (प्रतिनिधी) –
दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री गणेश मंदिर संस्थानातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तसेच मित्र-परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवली परिसरातील तरुणाईने फडके रोडवर गर्दी केली आहे. विविध आकर्षक रंगांचे पेहराव करून तरुण, तरुणी येथे जमले आहेत, ज्यामुळे संपूर्ण रस्ता रंगीबेरंगी आणि उत्साहाने भरलेला दिसत आहे.परंतु यंदा फडके रोडवर ढोलताशा पथकास वादनास बंदी असल्याने टिळकनगर रोडवर ढोल ताशा पथकांची गर्दी झाली होती.
बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक या 300 मीटर पट्ट्यात केवळ तरुणाईचा आनंद आणि जल्लोष दिसत आहे. गळाभेट, हस्तांदोलनाद्वारे तरुणाई एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने फडके रोडवर वाहनांना बंदी घालण्यात आली असून, गणेश मंदिरासमोर रंगविलेल्या आकर्षक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण, आणि बालकांनी सजलेले कपडे परिधान करून या उत्सवात सहभागी झाले आहेत.
फडके रोडवर दोन दिवसांपूर्वीच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, जी उपस्थितांना मोहवून टाकत आहे. अनेक कुटुंबीय आपल्या पाळीव श्वानांना सजवून येथे घेऊन आले आहेत. नव्याने खरेदी केलेली वाहने दाखवण्यासाठी मित्रमंडळी फडके रोडलगतच्या रस्त्यावर नव्या कोऱ्या गाड्यांसह जमलेली आहेत, ज्यामुळे या गाड्यांचे कौतुक करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे.
अंबिका हॉटेलजवळ डीजेचा दणदणाट सुरू असून, तरुणाई संगीताच्या तालावर थिरकत आहे. आप्पा दातार चौकात गणेश मंदिराच्या वतीने नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलिसांची तैनाती करण्यात आली असून, अग्निशमन दलाचे वाहनही सज्ज ठेवण्यात आले आहे.फडके रोडवर तरुणाईच्या गाठीभेटींमुळे जुन्या मित्रत्वाच्या नात्यांना नवा अर्थ मिळत आहे, आणि काहींच्या प्रेमाच्या बंधांना नवे आयाम मिळाले असल्याचे मानले जाते. फडके रोडवर उपस्थित राहिल्यावर तेथील चहाच्या ठेल्यांवर चहा, कॉफी आणि वडापावसाठी मोठी गर्दी दिसत आहे. पोलिसांनी आवाहन करूनही काही फटाके विक्रेत्यांनी आपली दुकाने हटवली नसल्याचे दृश्य आहे.
—