डोंबिवली, दि. 26 (प्रतिनिधी):
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने विठ्ठलवाडी परिसरातील खडेगोळवली येथे किन्नर अस्मिता संस्था आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेने संयुक्तपणे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. किन्नर समुदायाच्या सहभागातून आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने मतदानाची जनजागृती करण्यात आली.
मतदान जनजागृतीची व्यापक तयारी
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाने या जनजागृती उपक्रमाची आखणी केली होती. केडीएमसीचे शिक्षणाधिकारी व नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या नेतृत्वात जनजागृती पथकाने खडेगोळवली येथे किन्नर अस्मिता संस्थेच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमात किन्नर अस्मिता संस्थेतील तृतीयपंथी मतदारांनी “आम्ही मतदान करणार, तुम्ही पण मतदान करा” अशा जोरदार घोषणा देत मतदान करण्याची शपथ घेतली. यामुळे उपस्थित सर्व नागरिकांमध्ये मतदानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
ज्येष्ठ नागरिक सेवेचे आवाहन
याच अनुषंगाने कोळसेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेत देखील मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सचिव आणि इतर मान्यवर ज्येष्ठ नागरिकांनी मताधिकाराचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, मतदानाची शपथ घेतली. मतदानाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती गीत देखील वाजवण्यात आले.
या उपक्रमात स्टुडंट ऑयकॉनचे प्रणव देसाई, स्वीप टीमचे कर्मचारी समाधान मोरे, सर्जेश वेलेकर, रविंद्र तवर, जितेश म्हात्रे, अदिती पवार, प्रियंका पडवळ, आणि प्रतीक्षा भोईर यांच्यासह इतर सदस्यांनीही प्रमुख सहभाग घेतला.
—–
—–