डोंबिवली, 24 ऑक्टोबर (प्रतिनिधी):-
डोंबिवलीच्या सागाव परिसरात हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेल्याची घटना घडली. वादातून गाडीची काच फोडणे, पिस्तूल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, असे प्रकार घडले. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात राहणारे जनार्दन भोईर हे काल पत्नीसह घरी परतत होते. याच वेळी त्यांना गाडीसमोर दोन जण आले, त्यामुळे भोईर यांनी हॉर्न वाजवला. यावरून वाद झाला आणि रात्रीच्या वेळी वाद घालणाऱ्यांनी भोईर यांच्या कारच्या काचा फोडल्या.
घटनास्थळावरील व्यक्ती ओळखीची असल्यामुळे, जनार्दन भोईर यांचा भाऊ निलेश भोईर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जाब विचारण्यासाठी गेला. त्या दोघांनी निलेश भोईर यांच्या इमारतीत जाऊन त्यांना पिस्तूल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरडाओरड झाल्यामुळे आरोपी पळून गेले आणि शेजारच्या इमारतीत लपले. त्यांनी एका बॅगेत पिस्तूल आणि तलवारी ठेवून शेजारील इमारतीत ती बॅग लपवली होती.
आसपासच्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, आणि मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना अटक केली. आरोपींच्या बॅगेतून तीन तलवारी, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी निर गुटेला आणि नितेश गुप्ता या दोघांना अटक केली असून, फरार आरोपींमध्ये दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचा फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
——-