डोंबिवली: दि ; 22 ;-
डोंबिवलीतील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण विक्रमी मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या मताधिक्क्यात सातत्याने वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत हा वाढीचा कल कायम राहील आणि मताधिक्क्याचा नवा विक्रम नोंदवला जाईल, असे महायुतीच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त करण्यात आले. या परिषदेला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली, ज्यामुळे अनेक विकासकामे रखडली. मात्र, अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकारमुळे विकासकामांना गती मिळाली असून डोंबिवलीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सध्या वेगाने सुरू आहेत.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील सर्व डांबरी रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, आणि आगामी काही महिन्यांत डोंबिवलीकरांना सुसज्ज आणि चांगले रस्ते मिळतील. या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर शहरातील नागरी जीवनमान सुधारेल,असे त्यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला भाजपचे राहुल दामले, शशिकांत कांबळे, मंदार हळबे, विशू पेडणेकर, नंदू परब, शिवसेनेचे राजेश मोरे, राजेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
————