डोंबिवली, दि. २१:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण उमेदवारीची घोषणा केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना आणि ठाणे विधानसभा मतदार संघातून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कल्याण-शीळ रोडवरील मानपाडा चौकात राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात राजू पाटील यांनी ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी आणि प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा भेट म्हणून दिली.
राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, मनसेची उमेदवारी यादी अंतिम टप्प्यात असून एक-दोन दिवसांत उर्वरित यादी जाहीर करण्यात येईल. मात्र, याआधीच कल्याण ग्रामीणसाठी राजू पाटील आणि ठाण्यासाठी अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले की, येत्या २४ तारखेला आपण राजु पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा इथे येणार असून या दोन्ही उमेदवारांचा नामांकन फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजू पाटील यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. राजू पाटील यांनी यावेळी सांगितले की, या निवडणुकीत जनतेसमोर अनेक मुद्दे आहेत. ते पुढे म्हणाले, “पाच वर्षात तीन मुख्यमंत्री आणि दोन-तीन राज्यपाल बघितले. कोविड काळातील राजकारण लोक विसरलेले नाहीत. या सर्व मुद्द्यांसह आणि लोकांच्या मनातील असंतोषाच्या गुद्द्यांसह आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.”
यावेळी राज ठाकरे यांच्यासह आमदार राजू पाटील, माजी आमदार रमेश पाटील, मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर, डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष राहुल कामत, माजी शहराध्यक्ष मनोज घरत , हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक,मंदा पाटील, कोमल पाटील यांच्यासह अनेक प्रमूख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–