कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते आमदार भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून गेल्या 5 वर्षांत झालेल्या विकासकामांची सखोल माहिती देण्यात आली.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची सुरुवातीची अडीच वर्षे ही कोवीडशी लढण्यातच गेली. मात्र त्याकाळातही कोवीड रुग्णालय असो, ऑक्सिजन प्लांट असो, इतर वैद्यकीय साधन सामुग्री असो या सर्वांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. तर कोवीडनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मग खऱ्या अर्थाने कल्याण पश्चिमेमध्ये विकासाची गंगा वाहण्यास सुरुवात झाल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली. तर या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसह केडीएमसीला स्वतंत्र धरण असावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

तर नगरसेवक नसल्याने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात कोणताही दूजाभाव न करता आपण विकासकामे केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट करत आमदार भोईर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आपला विकासात्मक दृष्टीकोन अधोरेखित केला.

यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, विधानसभा संघटक संजय पाटील, प्रभूनाथ भोईर, महिला संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख नितीन माने, अरविंद पोटे, सुनिल वायले, मोहन उगले, गणेश जाधव, विद्याधर भोईर, विजय देशेकर, दुर्योधन पाटील, गोरख जाधव, हर्षला थविल, उज्वला मलबारी, सुजित रोकडे, अभिषेक मोरे, प्रतिक पेणकर, चिराग आनंद, अंकुश केणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!