डोंबिवली , दि,14 – कल्याण- डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलल्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

अशातच तब्बल ९५ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या पेट्रोल पंप चालकाविरोधात कारवाई करत कार्यालय सील करण्यात आले आहे.वारंवार सूचना, नोटीस दिल्यानंतर देखील मालमत्ता कराचा भरणा करण्याकडे थकबाकीदार दुर्लक्ष करत असतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.

अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेकडील रोशन पेट्रोल पंप मालकाने मालमत्ता करापोटी केडीएमसीचे तब्बल ९५ लाख रुपये थकवले होते. अनेकदा नोटीसा पाठवून देखील त्याने थकीत रकमेचा भरणा केला नाही. केडीएमसीला दाद दिली नाही. अखेर आज केडीएमसीच्या ब प्रभाग क्षेत्र अधिकारी सोनल देशमुख, कर विभाग सहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे, कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने रोशन पेट्रोल पंपचे कार्यालय सील केले आहे.

पंप चालकाचे कार्यालय सील केल्यानंतर कर भरणा करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अर्थात पुढील आठ दिवसात जर थकीत रकमेचा भरणा केला नाही; तर पेट्रोल पंप सील करण्यात येईल, असा इशारा देखील केडीएमसी अधिकाऱ्यांनी यावेळी दिला. केडीएमसीच्या या धडक कारवाईमुळे मालमत्ता कर थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *