मुंबई : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज गुरुवारी 10 ऑक्टोबर एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची सूचना दिली आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर सकाळी १० वाजता हलेकाय येथून त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.

जीवन परिचय

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937मध्ये नवल आणि सूनू टाटा यांच्या घरी झाला. त्यांनी 1962मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून वास्तुकलामध्ये पदवी घेतली. त्यानंतर 1975मध्ये हावर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. त्यांचे वडील नवल टाटा हे एक यशस्वी उद्योजक होते. त्यांनी टाटा समूहात महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. तर रतन टाटा यांची आई सोनी टाटा या गृहिणी होत्या.

असिस्टंट म्हणून एन्ट्री

रतन टाटा हे 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये असिस्टंट म्हणून रूजू झाले. त्याच वर्षी टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी ( आताची टाटा मोटर्स) मध्ये जमशेदपूर संयंत्रमध्ये सहा महिन्यांची ट्रेनिंग घेतली. विविध कंपन्यांमध्ये सेवा दिल्यानंतर त्यांनी 1971मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. 1981 मध्ये त्यांना समूहातील कंपनी टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. या ठिकाणच्या समूह रणनीतीक थिंक टँक आणि उच्च प्रौद्योगिकी व्यवसायात नव्या उपक्रमातील प्रवर्तक बदलण्यास ते जबाबदार होते.

1991 ते 28 डिसेंबर 2012 पर्यंत आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत टाटा समूहची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे ते अध्यक्ष होते. या काळात त्यांनी टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेवरेजज, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस सहीत अनेक कंपन्यांचे अध्यक्ष होते. भारतासह जगभरातील उद्योग जगताशी त्यांचा संबंध होता. रतन टाटा हे मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसचे ते आंतरराष्ट्रीय सल्लागार बोर्डात होते. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अॅलाइड ट्रस्टसचेही ते अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या प्रबंधन परिषदेचेही ते अध्यक्ष होते. दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विश्वस्तपदीही ते कार्यरत होते.

रतन टाटा यांची कामगिरी :

1. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून 1991-2012 पर्यंत सेवा. 2. जॅग्वार लँड रोवरची खरेदी (2008). 3. कोरसची खरेदी (2007). 4. टाटा स्टीलला जागतिक पातळीवर नेले 5. टाटा मोटर्सचे यश 6. टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेज (टीसीएस)ला जागतिक पातळीवर पोहोचवणे 7. टाटा समूहच्या जागतिक ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ

रतन टाटा यांचे पुरस्कार आणि सम्मान :

1. पद्म विभूषण (2008) 2. पद्म भूषण (2000) 3. ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (2009) 4. इंटरनेशनल हेरिटेज फाउंडेशनचे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड (2012)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *