डोंबिवली, दि. 09 :
शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा यासाठी कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत, तसेच डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष बाजारपेठ आयोजित करण्यात आली आहे. या बाजारपेठेचा शुभारंभ रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानावर ही बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक रविवारी ही बाजारपेठ डोंबिवलीतील विविध महापालिका मैदानांवर आयोजित केली जाईल.
थेट शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
या बाजारपेठेत डोंबिवलीकरांना सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, फळे, धान्य आणि कडधान्य इत्यादी उत्पादने स्वस्त दरात खरेदी करता येतील. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही यामधून फायदा होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
या बाजारपेठेचे उद्घाटन नेहरू मैदान येथे विशेष ‘फ्रुट महोत्सव’ स्वरूपात करण्यात आले. ठाणे जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी, माजी उप महापौर तथा नगरसेवक राहुल दामले, खुशबू चौधरी, संदीप पुराणिक, शशिकांत कांबळे, दत्ता माळेकर, दिनेश दुबे आणि अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.