आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून स्पर्धेला सुरुवात; 30 हून अधिक शाळांचे फुटबॉल संघ सहभागी
कल्याण, दि. 8 ऑक्टोबर:
कल्याण शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘कल्याण सुपर लीग’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज दिमाखदार सोहळ्यात पार पडले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. लालचौकीजवळील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला. युवा समाजसेवक ओम प्रभूनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
कल्याण परिसरातील 30 हून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दोन गटांमध्ये सामने खेळवले जात आहेत. स्पर्धेचा प्रारंभ सेंट लॉरेन्स आणि आचिव्हर्स या शाळांमधील प्रदर्शनीय सामन्याने झाला, ज्यामुळे खेळाडूंचे मनोबल उंचावले.
आमदार भोईर यांची संकल्पना
आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “आमच्या परिसरातील फुटबॉल खेळाडूंनी स्पर्धेची मागणी केली होती. फुटबॉल खेळाडूंना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे.” तसेच, त्यांनी यापुढे देखील क्रिकेटसारख्या फुटबॉल स्पर्धा नियमितपणे आयोजित करण्याची ग्वाही दिली.
प्रमुख मान्यवर आणि सहभागी
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आमदार विश्वनाथ भोईर, विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील यांच्यासह विभागप्रमुख राम तरे, अंकुश केणे, युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी, शाखाप्रमुख रोशन चौधरी, दिनेश शिंदे, तुकाराम टेमघरे, सतीश भोसले, रजनी भोईर, सुरेखा दिघे, भारत भोईर, भरत भोईर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.याशिवाय स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.