मंत्री रवींद्र चव्हाण आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते भूमिपूजन
डोंबिवली, दि. 08:
तू अंतर्यामी, सबका स्वामी,
तेरे चरणों में, चारो धाम…
हे राम, हे राम ! श्रीराम जन्मभूमी, श्री अयोध्या धाम येथे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन (भक्त निवास) या वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी राज्य शासनाच्या अपर सचिव मनीषा म्हैसकर, अयोध्येचे आमदार, खासदार तसेच यूपी सरकारचे अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र भवनाच्या स्थापनेमुळे अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या राम भक्तांना निवासाची उत्तम सोय उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने अयोध्येत उभारलेले हे भक्त निवास म्हणजे राम भक्तांच्या सेवेसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. प्रभू बालकराम मंदिरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना निवासासाठी सोय होण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. हिंदुत्वाचा मानबिंदू असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या या भवनामुळे जगभरातील भक्तांना एक सकारात्मक ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी रवींद्र चव्हाण आणि इतर मान्यवरांनी बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाची पाहणीही केली. भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर महाराष्ट्र भवनाचे बांधकाम लवकरच सुरू होईल आणि ते वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. अयोध्येतील मराठी समाजाच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
—