शंख आणि संबळ वादनाने भारावले वातावरण
कल्याण, ७ ऑक्टोबर:
कल्याणच्या पेशवेकालीन श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी, ललित पंचमीच्या विशेष औचित्याने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. सकल हिंदू समाज आणि महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या महाआरतीत भाविकांची मोठी गर्दी जमली होती. शंख आणि संबळ वादनामुळे मंदिरातील वातावरण भक्तीमय झाले.
कल्याणचे ग्रामदैवत असलेल्या किल्ले दुर्गाडीच्या दुर्गा देवी मंदिरानंतर महालक्ष्मी मंदिराला विशेष महत्त्व आहे. येथे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आहे, ज्यामुळे दूरवरून भक्त दर्शनासाठी येतात.महाआरतीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी भक्तीपूर्ण आरती गायली, तर शंख आणि संबळ वादनाने वातावरण अधिक पवित्र झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य मधुकर फडके, माजी विस्तारक डॉ. विवेक मोडक, विद्यमान विस्तारक विवेक वाणी, पराग तेली, डॉ. दिपक वझे, तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
—–